हेतु, शत्रुत्वसह हत्याकांडपुर्वी व नंतरचा घटनाक्रम – तेरणा ट्रस्ट, कारखाना, निवडणुक वाद – हल्ले ते धमकीसत्र, आरोपींची भागीदारी
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडात पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने कोर्टात लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपीनी शांत डोक्याने नियोजनबद्ध कट रचून हे हत्याकांड केले, संशयाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरावे असल्याने व आरोप सिद्ध होत असल्याने आरोपीना मृत्युदंड व आर्थिक दंडाची शिक्षा करावी अशी विनंती कोर्टास केली आहे त्याच बरोबर आनंदीदेवी व समद काझी यांच्या पत्नी रिझवान ह्यांना नुकसान भरपाईची (compensation) मागणी केली आहे. ऍड पी एम गवाड यांनी युक्तीवाद सादर केला, या खटल्याची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सीबीआय व आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांचा लेखी युक्तीवाद संपला असुन डॉ पाटील यांच्यासह अन्य संशयीत आरोपीचा युक्तीवाद बाकी असुन यात निकाल 30 सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हत्याकांडमधील दोषारोप पत्रात ठेवण्यात आलेले आरोप, त्याबाबतचे पुरावे, सुप्रीम कोर्टाचे निकाल, संदर्भ लेखी युक्तीवाद सोबत जोडले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अन्य साक्षीदार यांच्या जबाबातुन डॉ पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला पवनराजे यांच्यापासून धोका होता हे मांडले आहे. 2002 ते 2006 या हत्याकांड पुर्वीच्या व त्यानंतरचे वाद मांडले आहेत.
पवनराजे हत्येपुर्वी व हत्याकांडानंतर घडलेल्या घटनाचा क्रम प्राधान्याने पुरावे व दाखल्यांसह मांडला आहे. हत्येचा हेतु (Motive) कारणे, शत्रूत्व ( Enimity) हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा निवडणुक, राजकीय वाद, तेरणा ट्रस्ट, जिल्हा बँक, साखर घोटाळा, डॉ पद्मसिंह पाटील, आरोपी सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी यांच्यातील आर्थिक हीत संबंध, भागीदारी, पवनराजे यांना आलेल्या धमक्या यावर लेखी युक्तीवादात भर दिला आहे. हत्याकांडपुर्वी पवनराजे यांच्या 30 जुन 2003 ला ढोकी येथील सभेसह अन्य ठिकाणी झालेले हल्ले, धमकी असलेबाबतचे पत्र हत्याकांडनंतर तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर डॉ पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर व समर्थकांनी केलेली दगडफेक यांचा उल्लेख केला आहे.
नात्याने चुलत भाऊ असलेल्या डॉ पद्मसिंह पाटील व पवनराजे यांच्यात सुरुवातीपासून राजकीय सुप्त संघर्ष होता. 1991 साली पवनराजे हे जागजी येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना अध्यक्ष व्हायचे होते मात्र डॉ पाटील यांनी विरोध केल्याने त्यांनी राजीनामा दिला. महावितरण सदस्यपदी पवनराजे यांची नेमणूक करून या वादाचा समझोता करण्यात आला. 1995 तेरणा कारखाना संचालक झाले, 1994 जिल्हा बँक संचालक, 1996 ते 2002 जिल्हा बँक चेअरमन असा कारभार पवनराजे यांनी पाहिला मात्र 2002 नंतर होम ट्रेड व साखर घोटाळा याचे खापर पवनराजे यांच्यावर फोडण्यात आले, त्यातून पवनराजे यांना अटक व जेलमध्ये टाकले. पवनराजे यांना लोकांचा वाढता पाठिंबा पाहुन राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने खुन करून ‘काटा’ काढण्यात आल्याचे म्हण्टले आहे.
पवनराजे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लेखी पत्र त्यांनी 9 जुन 2003 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिले होते त्यात त्यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या पासून जीवाला धोका असल्याचे म्हणटले होते. मी मंत्री असल्याने मी तुला कोठेही कसा ही, कोणत्याही क्षणी मारून टाकीन, कोणालाही काहीही माहिती होऊ देणार नाही, कोणाला थांगपत्ता लागणार नाही, अशी धमकी डॉ पाटील यांनी दिल्याचा आरोप त्यात पत्रात होता मात्र कारवाई झाली नाही. ते पत्र पुरावा म्हणून सोबत जोडले आहे.
डॉ पाटील यांनी तेरणा शेतकरी सहकारी साखर करखान्याचा निधी वापरून तेरणा ट्रस्ट स्थापन केली त्यात त्यांनी मेडिकल कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था सुरु करून डोनेशनच्या नावाखाली पैसे कमावले, तेरणा ट्रस्टच्या गाड्या ते वापरत, शेतकऱ्यांना या ट्रस्टचा फायदा होत नव्हता त्यामुळे पवनराजे यांनी विरोध करीत याबाबतची तक्रार पवनराजे, शुरसेन राजेनिंबाळकर व संदीपान शितोळे यांनी पोलिस व लातूर येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली होती.
धाराशिव येथील कोर्टात पण त्यांनी तेरणा ट्रस्ट बाबत प्रकरण दाखल केले होते. 1996 साली एका निर्णया द्वारे तेरणा ट्रस्टच्या सहीचे अधिकार पृथ्वीजीत, राणाजगजीतसिंह पाटील, चंद्रकलादेवी यांना देण्यात आले, शेतकऱ्यांच्या मालकीची ट्रस्ट त्यांनी खासगी मालकीची केली. डॉ पद्मसिंह पाटील सत्तेत असल्याने कारवाई न झाल्याचा आरोप युक्तीवादात केला आहे. पवनराजे हत्या झाली की 13 व्या दिवशी तक्रारदार मयत झाल्याचे कारण देत कोर्टात ते प्रकरण बंद करण्यात आले.
पवनराजे निंबाळकर यांनी 2004 मध्ये अपक्ष म्हणून उस्मानाबाद विधानसभा निवडणूक डॉ पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लढवली त्यावेळी त्यांनी दैनिक जागृत जनप्रवास या वृत्तपत्रात पवनराजे निंबाळकर यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा ? आणि पवनराजे विधानसभेवर अशी बातमी छापून आणली व ते पेपर जीवनराव गोरे व इतर कार्यकर्ते यांनी वाटले, त्याची तक्रार बेंबळी पोलिसात गाडी नंबर व नावासह दिली होती मात्र कारवाई झाली नाही त्यानंतर 484 मतांनी पवनराजे यांचा पराभव झाला. त्यामुळे पवनराजे यांनी उच्च न्यायालयात डॉ पाटील विरोधात याचिका दाखल केली. ही याचिका मागे घेण्यासाठी अजित बाबा पाटील यांनी अनेकवेळा दबाव आणला मात्र ती पवनराजे यांनी मागे घेतली नाही.
डॉ पाटील यांना अटक केल्यावर त्यांच्या घरात तानाजी पाटील याच्या कळंबोली पोलिसांनी केलेल्या नार्को टेस्टच्या सीडी सापडल्या, नार्को सीडी पोलिसां ऐवजी त्यांच्याकडे होत्या त्याचा अर्थ पोलिसांवर त्यांचा दबाव होता. डॉ पाटील यांचे बंधू अजित बाबा यांच्या कन्या कीर्ती यांच्या लग्नात डॉ पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे एकत्र होते त्याचे फोटो सीबीआयने हस्तगत करीत जोडले आहेत.मंदाडे याच्या मुलीच्या लग्नात मोहन शुक्ला होता त्याचे फोटो जोडले आहेत.
आरोपी सतीश मंदाडे व डॉ पद्मसिंह पाटील आणि अजित पाटील हे व्यावसायिक भागीदार होते. पंचम ऍकवा ठाणे येथे मोहन शुक्ला व इतर पार्टनर होते. या सगळ्यांची पुर्वीपासून ओळख व कौटुंबिक संबंध होते, हत्यापुर्वी मंदाडे यांनी पवनराजे यांना अनेक वेळा डॉ पाटील यांच्याशी जुळवून घ्या असे सांगत धमक्या दिल्या. जे काही झाले ते मिटवून घ्या त्याचे परिणाम नाहीतर खूप वाईट होतील. तो खूप मोठा माणूस आहे, जर तुझे काही बरे वाईट झाले तुझ्या कुटुंबाचे कोण बघणार. असे धमाकावले त्यानंतर 10-12 दिवसात पवनराजे यांची हत्या झाली. डॉ पाटील यांनी हत्येची सुपारी दिल्याचे पवनराजे अनेक वेळा सांगत होते असे युक्तीवादात नमूद केले आहे.