धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल ऑगस्ट 2025 अखेर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यापुर्वी मे अखेर पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांना 5 साक्षीदार तपासण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे त्यामुळे आता ऑगस्ट अखेर निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. डॉ पाटील वागळता इतर सर्व आरोपीचे साक्षी, पुरावे व युक्तिवाद पुर्ण झाले आहेत.
हत्याकांडाचा तपास करणारे सीबीआयचे तपास अधिकारी एस पी राणा, मुबंई गुन्हे शाखेचे प्रवीण भगत, मिलींद गायकवाड, अनिल वडवणे, दिलीप रुपवते या 5 जणांची आता साक्ष होणार आहे, याची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे. 4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला.
सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांनी 6 जुन 2009 रोजी (खुन घटनेनंतर 3 वर्षांनी) डॉ पाटील यांना खासदार पदावर असताना मुंबईतुन अटक झाली त्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते प्रफुल्ल पटेल व डी पी त्रिपाठी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना यात मुख्य आरोपी करीत 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. नात्याने चुलत भाऊ असलेल्या पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपकाही ठेवला. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
2004 साली कै पवनराजे निंबाळकर यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवारी लढवली होती, त्यात डॉ पाटील हे अवघ्या 484 मतांनी विजयी झाले आणि राजकीय वितुष्ट टोकाला गेले. विधानसभा निकालानंतर तेरणा ट्रस्ट व तेरणा साखर घोटाळा आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते, पवनराजे यांनी तेरणा ट्रस्ट सभासदांच्या मालकी बाबत धाराशिव कोर्टात प्रकरण दाखल केले. 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांचा खुन झाला, त्यांच्या हत्यानंतर 13 व्या दिवशी तक्रारदार हयात नसल्याचे कारण देत हे प्रकरण कोर्टात बंद करण्यात आले, हे विशेष.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. अण्णा हजारे हत्येचा कट व 30 लाखांची सुपारी प्रकरण याच गुन्ह्यात उघड झाले, त्यात डॉ पद्मसिंह पाटील, मोहन शुक्ला व सतीश मंदाडे हे 3 जण आरोपी असुन लातुर कोर्टात पुढील सुनावणी 8 जुलै 2025 रोजी होणार आहेत. यात आरोपी सतीश मंदाडे हे हजर राहत नसल्याने लातुर कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे, मात्र पोलिसांना पण ते सापडेना झाले आहेत. मंदाडे हे मुंबई येथे सुनावणीस हजर असतात हे विशेष.
कै पवनराजे हत्याकांडापासुन धाराशिव जिल्ह्यात पाटील निंबाळकर हा राजकीय वाद सुरु आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांचे बंधु जयराजे निंबाळकर हे कायदेशीर न्याय मिळावा यासाठी गेली 19 वर्ष न्यायालयीन लढा देत आहेत. हत्याकांडनंतर काही वर्षातच डॉ पाटील व त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजप प्रवेश केला, डॉ पाटील हे सध्या सक्रीय राजकारणापासुन अलिप्त आहेत तर राणाजगजीतसिंह हे तुळजापूर मतदार संघातुन आमदार आहेत.
अटक सत्र
दुहेरी हत्याकांडात आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. हत्याकांडातील आरोपी पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे दोन्ही शुटर अजूनही जेलमध्ये असुन इतर सर्व आरोपी जामीनावर आहेत.