3 तपास यंत्रणा, 9 आरोपी, 128 साक्षीदार, 14 वर्ष सुनावणी – 25 लाखांची सुपारी, 2 शुटर व परदेशी शस्त्र, 24 मार्चला सुनावणी
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडातील साक्ष व पुरावे संपल्यानंतर सर्व आरोपीचा अंतीम युक्तिवाद, त्याला प्रतिउत्तर संपले असुन या खटल्याची पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार आहे. खटल्यातील संशयित आरोपीना कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोर्ट प्रकरण निकालासाठी राखीव ठेवून 24 मार्चला निकालाची तारीख जाहीर करू शकते.
शुटर पिंटू सिंग याला कोर्टात हजर करण्यासाठी वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. पिंटू सिंग उर्फ महात्मा चौधरी हा बिहार राज्यातील सिवान कारागृहात इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे तर इतर जामीनावर आहेत. हजर राहण्याचे आदेश देऊनही अनेक आरोपी वेगवेगळी कारणे देऊन हजेरी माफीचा अर्ज देत असल्याने कोर्टाने तंबी सुद्धा दिली आहे.
कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्रानी केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती त्या बंदुकीवर मेड इन युएसए, चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली. हत्येनंतर पोलिसांनी शस्त्र जप्त केली त्यात 18 जिवंत काडतुस होते, घटनेवेळी पवनराजे यांच्याकडे स्वतःचे परवानाधारक रिव्हालवर होते मात्र त्यांना तितका वेळ मिळाला नाही.
फेब्रुवारी 2005 रोजी पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. सुरुवातिला महाराष्ट्र पोलिस, त्यानंतर सीआयडी यांनी तपास केला मात्र कोणतेही धागेदोरे हाती न आल्याने आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजे निंबाळकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्यानंतर सीबीआयने तपास केला. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.
4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. राज्यभर गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांना 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन मिळाला आहे. सीबीआयने तपास करीत 20 ऑगस्ट 2009 रोजी पनवेल कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले त्यानंतर सविस्तर तपास करून 4 जुन 2010 रोजी पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले.
राजकीय स्वार्थ, सहानुभूती व लाभ मिळविण्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निंबाळकर परिवाराने भूमिका घेतली. पवनराजे यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्यांनी सभासद, शेतकरीसह अनेक शत्रू निर्माण केले असा आरोप करण्यात आला. 28 जानेवारी 26 रोजी ऍड महाडिक यांनी 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे मांडले. डॉ पाटील यांच्या वतीने अनेक गंभीर आरोप पवनराजे, ओमराजे व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात 9 संशयित आरोपी आहेत.











