धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपीचा अंतीम युक्तिवाद संपल्यावर सीबीआयने त्यांचे प्रतिउत्तर कोर्टात दाखल केले असुन या खटल्याची पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने जवळपास 1 हजार 250 पानाचा लेखी युक्तिवाद सादर करण्यात आल्यानंतर त्याला व काही केस लॉच्या अनुषंगाने सीबीआयने प्रतिउत्तर दिले.
पुढील सुनावणी वेळी आरोपी पिंटू सिंग याला कोर्टात हजर करण्यासाठी वॉरंट काढण्याचे आदेश कोर्टाने दिले, पिंटू सिंग उर्फ महात्मा चौधरी हा बिहार राज्यातील सिवान कारागृहात इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. हा खटला आता सुनावणीच्या अंतीम टप्प्यात असुन जलदगतीने चालवुन 27 मार्च 2026 पुर्वी निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे.
मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हत्येचा कट व सुपारी दिल्याचा गुन्हा याच हत्याकांड तपासात उघड झाला असुन तो लातुर येथील कोर्टात सुनावणी स्तरावर न्याय प्रविष्ट आहे. पवनराजे व त्यांचा चालक समद काझी यांचा खुन हे एक हत्याकांड सोबतच क्रूरता, विकृत मानसिकता दर्शवते. अनेक दिवस रेकी करून हत्याकांड करण्यात आले.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडी त्यानंतर सीबीआयने केला. आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, सीबीआयच्या वतीने ऍड एजाज खान, आनंदीदेवी निंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड यांनी बाजु मांडत आहेत.











