धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियाने पुन्हा धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सौर आणि पवनचक्की ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. नामांकित कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करत आहेत. मात्र गत काही महिन्यांपासून पवनचक्की माफियांचा मोठा धुडगूस सुरू आहे. खंडणी, मारहाण, तोडफोडीसह जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. पवनचक्की माफियांनी प्रचंड दहशत माजली आहे.
वाशी येथील टाटा पॉवर कंपनीच्या गोडाऊनवर बुधवारी 21 ऑगस्ट रोजी मोठा राडा झाला. याठिकाणी एकाचा गळा दाबून कत्तीने बेदम मारहाण करत जबर जखमी केले तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुपर वायझरलाही मारहाण करून जखमी केले तसेच कामावर असलेल्या टिप्परसह जेसीबीच्या काचा दगडाने फोडून मोठे नुकसान केले. याप्रकरणी 7 जणाविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीना अटक केली असुन त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाशी परिसरात टाटा पॉवर कंपनी 100 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज महावितरणच्या सबस्टेशनला पुरवली जाणार आहे. वाशी येथील साळुंके यांच्या पेट्रोल पंपाजवळ टाटा पॉवर कंपनीच्या गोडाऊनचे सध्या काम सुरू आहे. मात्र बुधवारी 21 ऑगस्ट रोजी टाटा पॉवर कंपनीच्या गोडाऊनवर 7 जणांनी मोठा राडा करत धुडगूस घातला. राजू उर्फ राजाभाऊ लक्ष्मण माने (वय 34 रा.भूम), संतोष त्रिंबक जाधवर (रा. इसरूप), नाना बबन जोगदंड (रा. पिंपळगाव क), काकासाहेब शिवाजी धावारे (रा. मांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर), परमेश्वर मच्छिंद्र पवार (रा. सोनारी), सुमित दिलीप तेलंग (रा भूम), तानाजी साहेबराव धावारे (रा. बार्शी) यांनी महावीर अर्जुन पवार (वय 19 वर्ष रा. वडर गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव) यांना नमूद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुला कामाला येवू नको असे सांगितले असताना तु काम चालू केलेस असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून कत्तीने मारहाण मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच सुपर वायझर धनंजय गायकवाड हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही नमूद आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले
दगडाने हायवाचे व जेसीबीच्या काचा फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या पिर्यादी महावीर पवार यांनी गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात कलम 109,115(2),324(5),351(2),189(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही वाशी तालुक्यातील शेलगाव येथे पवनचक्की साईडवर 10 ते 15 गावगुंडांनी धुडगूस घालत वाहनासह कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यातच पुन्हा असाच प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.