धाराशिव – समय सारथी
पवनचक्की विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आमरण उपोषण आंदोलन अखेर 5 व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आमदार कैलास पाटील यांनी या आंदोलनाला पाठबळ देत स्वतः सहभागी होत पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या मागण्या लावुन धरल्या, दिवसभराच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर पवनचक्की कंपन्यानी सकारात्मक भुमिका घेतली. पवनचक्की कंपन्यानी लेखी आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाने मध्यस्थी केली. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी पवनचक्की कंपन्यानी दिलेल्या आश्वासानाची पत्र शेतकऱ्यांना दिली.
रिन्यू विंड पावर, सिरेंटीका व 02 यासह अन्य कंपनी विरोधात भुम, वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले होते. वाशी तालुक्यातील सारोळा येथील सुजित मोरे व तांदूळवाडी येथील गणेश चौधरी या शेतकऱ्यांना पवनचक्की कंपन्यानी दिलेल्या लेखी पत्राची प्रत देण्यात आली. या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
सिरेंटीका कंपनीने 11 ऑगस्टपर्यंत तर रिन्यू विंड एनर्जी कंपनीने 14 ऑगस्ट पर्यंत शेतकरी व कंपनी यांच्यात झालेल्या कराराच्या नकला जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे लेखी दिले. शेतकऱ्यांना किती मावेजा दिला याची माहिती देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे, शेतकऱ्यांना दरापेक्षा कमी मावेजा दिला असेल तर चर्चेची तयारी दर्शवली आहे.
समसमान मोबदल्याची शेतकरी यांची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमतीविना किंवा कोऱ्या करारनाम्यांवर सह्या घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. काही करारनाम्यांमध्ये मजकूर नसताना शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या गेल्या असून, काही ठिकाणी मिळालेला मोबदला हजारांत, तर काही ठिकाणी लाखांत आहे, ही मोठी तफावत अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांसोबत केलेले करारनामे इंग्रजी भाषेत आहेत आणि ते अद्याप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत असे अनेक मुद्दे आहेत.