धाराशिव – समय सारथी
बहुप्रतिक्षित तुळजापूर विधानसभा मतदार संघांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असुन या मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेसचे धीरज पाटील यांचे विरुद्ध महायुतीचे भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे, पाटील विरुद्ध पाटील असा सामना रंगणार आहे. धीरज पाटील हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुक लढवत असुन त्यांना जिल्हा परिषद राजकारणाचा अभ्यास व अनुभव आहे. सिंदफळ येथील एका कार्यक्रमात दोन्ही पाटलात वाद झाला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात हे पुन्हा आमने सामने येणार आहेत.
माजी मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण यांचा पत्ता वयाचे कारण पुढे करीत कट केला आहे, चव्हाण व अशोक जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 5 वेळेस आमदार राहिलेले व एक वेळेस विधानसभा लढविलेल्या मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली नाही त्यांनी अर्ज भरत प्रचार सुद्धा सुरु केला होता त्यामुळे त्यांची भुमिका महत्वाची आहे. अशोक जगदाळे यांनी सुद्धा तयारी केली आहे.
धीरज पाटील हे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असुन ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आहेत.ते तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ जिल्हा परिषद गटातून सदस्य होते तर त्यांचे वडील अप्पासाहेब पाटील हे अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे इंदिरा गांधी पासुन अनेक राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. राजकीय वारसा व संपर्क असलेले पाटील हे पहिल्यांदा विधानसभा लढवत आहेत.
तुळजापूर मतदार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1978 व 1985 ची निवडणूक शेकापच्या माणिकराव खपले यांनी जिंकली. मात्र, उर्वरित काळात येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण 1990 साली पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंतच्या 20 वर्षाच्या काळात ते कायम आमदार राहिले. 2019 च्या निवडणुकीच्या आखाड्यात ते पराभूत झाले.
मधुकरराव चव्हाण हे 25 वर्ष आमदार राहिले व ते काँग्रेस सरकारच्या काळात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रीही राहिले. तुळजापूर मतदार संघ व आमदार चव्हाण असे गणित बनले होते मात्र धाराशिव मतदार संघ बदलून तुळजापूर येथे पहिल्यांदा उभे राहिलेले भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव केला. 2019 मध्ये राणाजगजीतसिंह पाटील यांना 99 हजार 34 मते तर चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली, 23 हजार 169 मतांनी पाटील विजयी झाले.
तुळजापूर मतदार संघात 3 लाख 82 हजार 467 मतदार असुन गेल्या 2019 च्या निवडणुकीत 3 लाख 51 हजार 842 मतदार होते, 30 हजार 625 मतांची वाढ झाली आहे. हे वाढीव मतदान निर्णायक असणार आहे.