धाराशिव – समय सारथी
पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांनी आता वज्रमुठ आवळली असून बँकेच्या फसवणुकी विरुद्ध एकाच आठवड्या दोन बैठका घेत अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आता न्यायालयीन व रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आष्टामोड येथील साई मंदिरात पुन्हा एकदा सर्व खातेदारांची बैठक झाली. यापुढील सर्व प्रक्रिया व जो निर्णय अनिल दादा जगताप घेतील तो आम्हाला मान्य असेल असा विश्वास दाखवत न्यायालयीन व रस्त्यावरच्या आंदोलनासाठी तयार असल्याचे सर्वांनी सांगितले.
पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये खातेदारांच्या खूप मोठ्या रकमा अडकल्या असून बँकेने शाखा बंद केल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व खातेदारांनी अनिल दादा जगताप यांना साकडे घालण्यात या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत दोन बैठका पार पाडून पुढील करावयाच्या सर्व नियोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे.
2015 मध्ये पार्वती मल्टीस्टेट बँकेची स्थापना करण्यात आली मुख्य कार्यालय दत्तनगर पुणे येथे असून त्याच्या लोहारा सास्तुर सालेगाव तुरोरी कजगी डाळिंब या ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या ज्यादा रकमेचे आमिष दाखवल्यामुळे अनेकांनी या शाखा मधून मोठ्या रकमा जमा केल्या अगदी 12% पर्यंत व्याजदर देण्याचे अमित खातेदारांना दाखवण्यात आल्याचे त्यांच्या एफडीवरून दिसत आहे. 2023 पर्यंत बँक सुरळीत चालू होती मात्र त्यानंतर हळूहळू खातेदारांचे रक्कम घेण्याचे बँकेकडून टाळाटाळ होण्यास सुरुवात झाली त्यानंतरच्या कालखंडात तर शाखा बंद करून आता एकही रुपया खातेदारांना मिळत नाही. त्यामुळे आता ही सर्व प्रक्रिया न्यायालयीन व रस्त्यावरच्या आंदोलनात सुरू करून पैसे मिळवण्यासाठी खातेदार प्रयत्नाची पराकाष्टा करत आहे.
दोषारोप पत्रही दाखल मात्र आरोपी मोकाट…
यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर रक्कम पंधरा लाखाच्या पुढे असल्याने आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी तपास करून चेअरमन व काही संचालकांना अटक केली होती मात्र काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन एक वर्ष झाले तरी अद्यापही काही संचालक अगदी उजळमात्याने मोकाट फिरत आहेत त्यांच्या जामीन अर्जावर उमरगा सत्र न्यायालयात 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
विमा संरक्षण नसल्याने खातेदारांना आर्थिक संकट
पाच लाख रुपये च्या ठेवी असणाऱ्या काही मल्टीस्टेट व कॉपरेटिव्ह सोसायटी यांना विमा संरक्षण आहे मात्र पार्वती मल्टीस्टेट बँकेचा त्या यादीत समावेश नसल्याने आता सर्व खातेदारांना रक्कम मिळण्यासाठी न्यायालयाचाच शेवटचा आधार उरला आहे.अनेक ठेविदाराने आयुष्यभर घाम गाळून कष्ट करून लाखो रुपयांच्या ठेवी पार्वती मल्टीस्टेट मध्ये ठेवल्या मात्र आता त्यांचा पैसा मिळत नाही त्यामुळे आर्थिक उच्च मना आणि त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
मी माझ्या आयुष्यात एक एक रुपया जमा करून तसेच शेती विकल्यानंतर आलेली सर्व रक्कम पार्वती मल्टीस्टेट बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली होती ती 45 लाख रुपये इतकी आहे एफडी ची कालमर्यादा संपूर्ण ही दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे मात्र बँकेकडून एक रुपयाही मिळत नाही विशेष म्हणजे बँकेचे पूर्वीचे व आत्ताचे चेअरमन माझ्याच गावातील आहेत तरी देखील माझ्यावरती आर्थिक अन्याय होत आहे अशी व्यथा दिलीप दत्तू गोरे रा. सालेगाव यांनी मांडली.
बँकेत अनेक शेतकरी कष्टकरी दिव्यांग अपंग महिला यांनी ठेवी ठेवल्या आहेत. रकमेचा आकडा खूप मोठा असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केवळ 162 खातेदारांचा पाच कोटी 73 लाखाचाच उल्लेख आहे. मात्र ही रक्कम खूप मोठी आहे सर्व ठेवीदारांनी यात लक्ष घालण्याची मला विनंती केली आहे. यात मनी लॉन्ड्री झाल्याची ही शक्यता नाकारता येत नाही उच्च न्यायालय, इडी, आरबीआय ,सहकार जिल्हाधिकारी यांच्याकडे वेगवेगळ्या याचिका दाखल करून त्यांचा एक ना एक रुपया मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा संकल्प अनिल जगताप यांनी व्यक्त केला.