धाराशिव – समय सारथी
पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांनी आता वज्रमुठ आवळली असून बँकेच्या फसवणुकी विरुद्ध एक होत सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. या बँकेने अनेक ठेवीदार यांची फसवणूक केली असुन पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे, काही आरोपी संचालक फरार आहेत. ठेवीदार यांचे पैसे परत देऊन आरोपीना अटक करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यापुढील सर्व प्रक्रिया व जो निर्णय अनिल दादा जगताप घेतील तो आम्हाला मान्य असेल असा विश्वास दाखवत न्यायालयीन व रस्त्यावरच्या आंदोलन छेडले आहे.
पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये खातेदारांच्या खूप मोठ्या रकमा अडकल्या असून बँकेने शाखा बंद केल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. 2015 मध्ये पार्वती मल्टीस्टेट बँकेची स्थापना करण्यात आली मुख्य कार्यालय दत्तनगर पुणे येथे असून त्याच्या लोहारा सास्तुर सालेगाव तुरोरी कजगी डाळिंब या ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या ज्यादा रकमेचे आमिष दाखवल्यामुळे अनेकांनी या शाखा मधून मोठ्या रकमा जमा केल्या अगदी 12% पर्यंत व्याजदर देण्याचे आमिष खातेदारांना दाखवण्यात आल्याचे त्यांच्या एफडीवरून दिसत आहे.
2023 पर्यंत बँक सुरळीत चालू होती मात्र त्यानंतर हळूहळू खातेदारांचे रक्कम घेण्याचे बँकेकडून टाळाटाळ होण्यास सुरुवात झाली त्यानंतरच्या कालखंडात तर शाखा बंद करून आता एकही रुपया खातेदारांना मिळत नाही. रकमेचा आकडा खूप मोठा असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केवळ 162 खातेदारांचा पाच कोटी 73 लाखाचाच उल्लेख आहे.
दोषारोप पत्रही दाखल मात्र आरोपी मोकाट…
पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर रक्कम पंधरा लाखाच्या पुढे असल्याने आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी तपास करून चेअरमन व काही संचालकांना अटक केली होती मात्र काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन एक वर्ष झाले तरी अद्यापही काही संचालक अगदी उजळमात्याने मोकाट फिरत आहेत त्यांच्या जामीन अर्जावर उमरगा सत्र न्यायालयात 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.