धाराशिव – समय सारथी
भुम परंडा वाशी विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी 81 हजार 177 मतांची आघाडी मिळाली. राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यासाठी हा निकाल धोक्याची घंटा असुन यावर आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे. विशेष म्हणजे मंत्री सावंत यांनी लोकसभा प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेत ओमराजे यांच्यावर अनेक मुद्यावर हल्लाबोल केला होता. सावंत यांनी शक्ती युक्ती पणाला लावली होती, माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील व शंकरराव बोरकर या त्रिमूर्तीचा करिश्मा या मतदार संघात चालला, मतदानादिवशी पाटसांगवी येथे एक खुन झाला होता त्याचा दुरगामी परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.
अर्चना पाटील यांना या मतदार संघात सर्वात कमी 52 हजार 671 मते तर ओमराजे यांना 1 लाख 33 हजार 848 इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 5 हजार 272 इतकी मते मिळाली आहेत. पालकमंत्री सावंत यांच्या मुगाव इथेही ओमराजे यांना आघाडी मिळाली हे विशेष. मंत्री सावंत यांनी ओमराजे यांचा राजकीय बाप काढत तेरणा कारखाना, जिल्हा बँक, आर्थिक रसद व इतर मुद्यावर टीका केली होती, जे पाटील कुटुंबाला आयुष्यात जमले नाही ते सावंत यांनी बोलुन दाखवले मात्र ते जनतेने सपशेल नाकारले.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सत्ता परिवर्तनवेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते तर बहीण अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करुन उभा असेल असे सांगत मंत्री सावंत यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री सावंत यांचा 32 हजार 902 मतांनी विजय झाला आहे, त्यांनी आमदारकी विजयाची हॅट्रिक केलेले राहुल मोटे यांचा पराभव केला होता, सावंत यांना विक्रमी 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती मात्र 2024 च्या लोकसभेत परंडा मतदार संघात 81 हजार 177 मतांची आघाडी मिळाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत परंडा वाशी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 22 हजार 78 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 5 हजार 67 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 78 हजार 489 मते मिळाली होती. 2024 च्या लोकसभेत तब्बल 81 हजार 177 मताची आघाडी मिळाली.
2024 लोकसभा निवडणुकीत परंडा भुम वाशी विधानसभा मतदार संघात 63.53 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 25 हजार 165 पैकी 2 लाख 6 हजार 632 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भुम परंडा मतदार संघात मतमोजणीच्या 27 फेऱ्या/राऊंड झाले.