कोर्टात अहवाल सादर – कारवाईवर प्रश्नचिन्ह, साहित्य घेऊनच रेडला, ते दोघे ‘निष्पाप’ की ‘पुरावा’ बदलला ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात जानेवारी 2024 मध्ये झालेल्या ड्रग्ज विक्री प्रकरणात एक मोठी बातमी सुत्राकडुन हाती आली आहे. परंडा पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले 8.33 ग्रॅम हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गुन्ह्याची फिर्याद गैरसमजुतीतुन दिल्याने गुन्हा रद्द करावा यासाठी ‘क’ समरी कोर्टात मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. भुम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत 19 मार्च 2025 रोजी परंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. पहिल्या आरोपीला अटक केल्यानंतर तब्बल 7 महिने तपास करुन पुरावा मिळाल्यावर दुसऱ्या आरोपीला अटक केली. अटक केलेले ते 2 आरोपी ‘निष्पाप’ आहेत की आरोपीना वाचवण्यासाठी कोणी ‘पुरावा’ बदलला असा संशय व्यक्त होत आहे. परंडा येथे झालेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली असुन सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

19 जानेवारी 2024 रोजी परंडा पोलिसांनी परंडा-देवगाव रोडवर खंडेश्वरी शाळेच्या समोर रोडच्या बाजूला कारवाई करीत पुणे जिल्ह्यातील मुंडवा येथील इम्रान नसिर शेख (वय 29 मजुरी ) याला अटक केली. त्याच्या पॅंटीच्या उजव्या खिशात पांढऱ्या रंगाची क्रिस्टल पावडर सापडली, त्याचा उग्र वास येत होता. आरोपीने स्वतः ते एमडी ड्रग्ज असल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन बळीराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून कलम 8(क) 22 (ब) गुंगीकारक औषधी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करुन अटक केली. पोलिसांनी पनवेल पासिंगची एमएच 46 एयु 2832 गाडी जप्त केली. कोर्टाने इम्रानला 21 ते 25 जानेवारी अशी 6 दिवसांची पोलिस कोठडी दिली त्यानंतर त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली, 9 फेब्रुवारीला त्याला जामीन मंजुर झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 7 महिन्यांनी परंडा शहरातील मुजावर गल्ली येथील अन्वर उर्फ अण्णा जलील अत्तार याला 26 ऑगस्ट 2024 रोजी अटक केली. कोर्टाने त्याला 27 ते 29 ऑगस्ट अशी 3 दिवसांची पोलिस कोठडी दिली व नंतर 12 सप्टेंबर ला जामीन दिला. पोलिसांनी या गुन्ह्यात 12 साक्षीदार व इतर पुरावे हस्तगत केले मात्र वैज्ञानिक प्रयोगशाळेत ते ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचे समोर आले आणि गुन्हा रद्द करण्याचा प्रस्ताव कोर्टात द्यावा लागला.
दोषी कोण – परंडा पोलिसांनी केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जप्त केलेली पावडर ही ड्रग्ज आहे का याची कोणतीही प्राथमिक शहानिशा न करता गुन्हा नोंद करण्याची व कारवाईची घाई का केली ? प्रयोगशाळेत सादर केलेला ‘पुरावा’ कोणी बदलला तर नाही ना ? जर नसेल तर या 2 जणांना निष्पाप व पोलिसांच्या कारवाईचा ‘बळी’ म्हणावे लागेल. फील्ड ड्रग्ज टेस्ट किट वापर पोलिसांनी केला का ? टीप देणारा तो दक्ष नागरिक कोण ? आरोपीचा कॅल्शियम क्लोराईड पावडर जवळ ठेवण्याचा हेतू काय?
सील साहित्यासह कारवाईला रवाना – संशयाला वाव
प्रयोगशाळेचा अहवाल हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा असतो. अहवालात एमडी ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा), मॅग्नेशियम सल्फेट आढळल्यास, आरोपात मोठा फरक पडतो कारण कॅल्शियम क्लोराईड हा केवळ एक रासायनिक संयुग (केमिकल कंपाऊंड) असून, तो उत्तेजक किंवा बेकायदेशीर पदार्थ नाही. कॅल्शियम क्लोराईड हा ड्रग्ज सूचीमध्ये समाविष्ट नसल्याने या प्रकरणात एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोप टिकत नाहीत.
पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार,19 जानेवारी 2024 रोजी परंडा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली, त्यावेळी सपोनि कविता मुसळे, पोकॉ यादव, मुलाणी उपस्थित होते. शहरात एमडी ड्रग्ज तरुण सेवन करीत आहेत अश्या तक्रारी आहेत. विक्री करणाऱ्याबद्दल शहर परिसरात गस्त घालुन माहिती काढावी व कारवाई करावी अश्या सुचना दिल्या. त्यानंतर सपोनि मुसळे यांनी गस्ती करीता रवाना होणेपुर्वी पोकॉ मुलाणी यांना लॅपटॉप, प्रिंटरचे साहित्य, पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेणेबाबत सुचना केल्या, त्याप्रमाणे आम्ही साहित्य घेऊन स्टेशन डायरीला नोंद करुन शासकीय वाहनाने रवाना झालो. देवगाव रोडने जात असताना एका ‘दक्ष’ नागरिकाने आमचे गाडीस हात दाखवून सांगितले व नंतर रेड केली, आरोपी ड्रग्जसह पकडला.
वरील मजकूर हा फिर्यादीतील आहे. पोलिस निरीक्षक यांनी बैठक घेऊन सुचना दिल्यानंतर मुसळे यांचे पथक सील व इतर लागणारे साहित्य घेऊनच रवाना झाले, जसे यांना अगोदरच माहिती होते की आज आरोपी हे ड्रग्जसह नक्की सापडणार आहे व त्याचा पंचनामा करण्यासाठी सील साहित्य, प्रिंटर लागेल. पोलिसांनी हिच काळजी किंवा तत्परता मुद्देमाल जप्त केल्यावर व लॅबला पाठवताना घ्यायला हवी होती. जर प्रयोगशाळेत सील मुद्देमाल बदलला गेला असेल तर हा एक गंभीर प्रकार असु शकतो. बैठक होते काय आणि त्यानंतर पथक सील साहित्य सोबत घेऊन जाते ही सगळी कार्यपद्धती संशयास्पद आहे.
फील्ड ड्रग्ज टेस्ट किट वापर केला का ?
अमली पदार्थ ओळखण्यासाठी फील्ड ड्रग्ज टेस्ट किट ही पोलिसांकडे असते त्याचा वापर करणे अपेक्षित आहे. ही किट वापरून लगेचच पदार्थाची प्राथमिक चाचणी करता येते. Marquis Reagent टेस्ट ही एमडी ड्रग्ज असल्यास विशिष्ट रंगद्रव्य (जसे की गडद जांभळा/काळा) तयार होते. Simon’s Reagent टेस्ट ही एमडी ड्रग्जमधील विशिष्ट घटकांची ओळख करण्यात मदत करते. फील्ड टेस्टमध्ये संशयास्पद पदार्थाचे संकेत मिळाल्यास साधारणपणे पोलिस पुढील कारवाई करतात ही कार्यपद्धती आहे. फिल्ड टेस्ट नंतर अंतीम निर्णयासाठी प्रयोगशाळा अहवाल महत्वाचा मानला जातो, त्यावर सर्व ठरते.
एमडी ड्रग्ज ऐवजी इतर पावडर –