धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील ड्रग्ज तस्करीचा मास्टर माईंड कोण याचा शोध अजून लागला नसुन पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची धाराशिव येथील जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
ड्रग्ज गुन्ह्यात पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले असले तरी अन्य आरोपीचा शोध सुरु आहे. माहिती व तांत्रिक विश्लेषण आधारे पोलिस तपास करीत आहेत. 2 नावे निष्पन्न झाल्याची सूत्रांची माहिती असुन 2 पथक शोध घेत आहेत. यापुर्वी देखील परंडा येथे ड्रग्ज सापडले होते तर बार्शी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अनेक आरोपी हे परंडा येथील होते. अवैध शस्त्र व ड्रग्जचे गुन्हे नोंद झाल्याने मोठी टोळी सक्रीय असल्याचे बोलले जाते.
धाराशिव पोलिसांनी परंडा येथे कारवाई करीत 20 पुड्या ड्रग्ज जप्त करीत बालाजी सोनवणे या आरोपीला अटक केली होती. ड्रग्ज सापडल्याने या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असल्याचे दिसते, या रॅकेटला वरदहस्त कोणाचा ? असाही सवाल होत आहे. पोलिसांनी 20 पॉलीथिनीची पिशवी त्यामध्ये 14.5 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर जप्त केली असुन 15 हजार प्रती ग्रामनुसार 2 लाख 17 हजार किमंत आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोहेकॉ नितीन प्रकाशराव गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून कलम 8 (क), 21 (ब) गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशाने तपास पीएसआय खरात करीत आहेत.












