मुंबई – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना पंढरपूर येथील आषाढी वारीच्या व्यवस्थेकरीता व नियोजनासाठी समन्वयक मंत्री म्हणुन मुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 जुलै रोजी पंढरपूर येथे जाणार असुन ते वारीच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत, मंत्री सावंत हे सर्व नियोजन पाहत आहेत.
17 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा होते त्याला राज्यसह देशभरातील वारकरी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. जवळपास 15 लाख पेक्षा अधिक भाविक पंढरपूरला येतात, इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी वारकरी एकत्र आल्याने नगर परिषदेच्या प्रशासनावर विशेषत स्वच्छता व आरोग्य सुविधावर ताण येतो यासाठी नियोजन व समन्व्य साधण्यासाठी मंत्री सावंत यांना समन्वयक मंत्री म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ असे म्हणत सलग दुसऱ्या वर्षी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पना व पुढाकारातुन 12 जुलैपर्यंत 6 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा देण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमधील वारकरी येत आहेत. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवत आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले आहेत. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली आहे, कारण आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने मोठी प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे.
फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच 102 व 108 या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत.पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची वैशिष्ट्ये
– पालखी सोहळा 24 साठी एकूण मनुष्यबळ – 6,368
– प्रत्येक 5 किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – 258
– वारी दरम्यान 102 व 108 रुग्णवाहिका 24*7 उपलब्ध – 707
– दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – 5885
– महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – 136
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – 136
– पालखी मार्गावर आरोग्य दूत – 212
– पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – 9
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 5 बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – 87
– आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम
– विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती