धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या असुन पळसप गटातुन नेताजी पाटील यांनी माघार घेतली आहे. पाटील यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अजित लाकाळ यांना शिवसेना पक्षाकरडुन अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. शिवसैनिक यांच्या दबावापुढे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झुकावे लागले व नेताजी पाटील यांना सपशेल माघार घ्यावी लागली.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भेट घेतली, त्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले होते की काही जागावर बदल अपेक्षित असुन त्या प्रमाणे पळसप या जागेवर शिवसैनिक याला न्याय मिळाला.
महायुतीच्या जागा वाटपात पळसप ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली होती मात्र त्या ठिकाणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत सावली प्रमाणे असलेले भाजप पदाधिकारी नेताजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाशी संबंध नसताना व मतदार संघातील नसताना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक होते त्यांनी राडा घालत भुमिका स्पष्ट केली.
नेताजी पाटील आता शिवसेना पक्षात राहणार की पुन्हा भाजप पक्षात स्वगृही परतून घरवापसी करणार हे पाहावे लागेल. पळसप गटात दिलीप मेहेत्रे माळी हे अपक्ष उमेदवार असुन ते भाजप पक्षाशी संबंधित आहेत, लाकाळ यांची नाकाबंदी करण्यासाठी ही उमेदवारी ठेवण्यात आल्याचे बोलले जात असुन आगामी काळात इथे बऱ्याच घडामोडी होणार आहेत.












