‘क समरी’ अर्थात ‘गुन्हा घडला नाही’ – 771 पानांचा अहवाल, तत्कालीन संचालकांना दिलासा
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत 5 कोटी 46 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने धाराशिव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अंतीम अहवाल सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात ‘क समरी’ अर्थात ‘गुन्हा घडला नाही’ असा अहवाल दिला असुन त्या अहवालामुळे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. ‘क’ समरी अहवाल दाखल झाल्यावर कोर्ट फिर्यादीला नोटीस काढुन त्यांचे म्हणणे ऐकून घेते व त्यानंतर अहवालावर अंतीम निर्णय देते (अहवाल स्वीकारणे किंवा नाकारणे). आर्थिक गुन्हे शाखेने 12 वेगवेगळ्या मुद्यावर तपास करीत 771 पानांचा अंतीम अहवालात कोर्टात सादर केला आहे.
डीप बॉण्ड अनुषंगाने संचालक मंडळाने गुंतवणुकीच्या लिमिटचे उल्लंघन केल्याने आरबीआयने त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असुन तो बँकेने भरला आहे. बॉण्डचे सर्व व्यवहार चेकने केला आहे, हा व्यवहार वयक्तिक लाभापोटी केल्याचे अभिलेखावर आलेले नाही. तक्रार ही घटनेच्या 17 वर्षानंतर तत्कालीन संचालक मंडळाचे विरुद्ध गैरसमजातुन दिली असल्याचा निष्कर्ष तपास अधिकारी यांनी काढला आहे. बँक काही बाबतीत अनभिज्ञ होती, तत्कालीन संचालक मंडळाला कोणताही फायदा झाला नाही, त्यांनी फिर्यादी, सभासद, ठेवीदार अथवा इतर कोणाचा विश्वासघात करुन फसवणूक केली नाही. संचालक मंडळातील काही सदस्य मयत आहेत. बॉण्ड खरेदीच्या या तोट्यामुळे नक्की कोणत्या सभासदाचे कोणते व त्याच्या ठेवीला कोणतेही नुकसान झाल्याचे दिसुन येत नाही यावरून यात Mens Rea (गुन्हेगारी हेतू किंवा मानसिकता) दिसुन येत नाही, त्यांनी गुन्हा केल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून निष्पन्न होत नाही असे पोलीस अहवालात नमुद आहे.
अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, शासकीय अभियोक्ता ऍड पंडीत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी ‘क’ समरी बाबतची शिफारस केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात तक्रारदार प्रवीण धाबेकर, व्यापारी गंगाधर ज्ञानोबा कापसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय घोडके, टेक्सटाईल को बँके बेंगलोरचे सीईओ श्रीनिवास मुर्ती, जैन बँक मुंबईचे सीईओ एलन रॉड्रीगेस, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ यासह इतरांना साक्षीदार दाखवले आहे.
नोयडा टोल ब्रिज ही कंपनीदिवाळखोरीत निघालेली माहिती असताना जनता बँकेने ठेवीदार व सभासद यांच्या पैशातून डीप डिस्काउंट बॉण्ड खरेदी केले. एका शेअरची रक्कम अलाहाबाद उच्च न्यायालयाने 9 हजार 500 रुपये असतानाही जनता बँकेने ब्रोकरच्या माध्यमातून एक शेअर 23 हजार रुपयाला असे 4 हजार 400 बॉण्ड विकत घेतले. एक बॉण्ड तब्बल 13 हजार 500 रुपयांना अधिकने खरेदी केला, 28 सप्टेंबर 2005 ते 31 मार्च 2008 या काळात 5 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोपबँकेचे सभासद असलेल्या प्रवीण विष्णुपंत धाबेकर यांनी केला. त्यांनी दिलेल्या तक्रारी कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला.
नोयडा टोल ब्रिज कंपनीचे बॉण्ड एसीई ग्लीरस ट्रेडिंग या ब्रोकर कंपनी मार्फत 29 सप्टेंबर 2005 रोजी 1 हजार 300, 5 ऑक्टोबर रोजी 2 हजार 200 व 13 ऑक्टोबर 900 असे 4 हजार 400 बॉण्ड खरेदी केले.पैसे गुंतवणूक करीत असताना बँकेने नोयडा ब्रिज कंपनीचे मागील 3 वर्षाचे आर्थिक ताळेबंद, नफा तोटा पत्रक व रकमेची सुरक्षितता विचारात घेऊन गुंतवणूक केली नाही. आरबीआयच्या नियमाचे पालन केले नाही असा आरोप धाबेकर यांनी केला.
ताळेबंद पत्रकात अपहरीत रक्कम नमूद केली गेली मात्र इमारत निधी 1 कोटी 81 लाख, अमृत महोत्सव निधी 15 लाख, सेवक कल्याण निधी 1 कोटी 50 लाख, धर्मादाय निधी 25 लाख, घसारा निधी 47 लाख व इतर वळवुन तो भरण्यात आला त्यामुळे ही रक्कम 31 मार्च 2008 नंतर ताळेबंद पत्रकात दिसली नाही असे धाबेकर यांचे तक्रारीत म्हणणे आहे. बँकेने अनेक वेळा नियमबाह्यरित्या काही मर्जितील संचालक, पुढारी कम कर्जदार यांचे कर्जाचे वन टाइम सेटलमेंट केले असल्याच्या तक्रारी आहेत,याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान चेअरमन वसंतराव संभाजी नागदे, व्हा चेअरमन वैजिनाथराव शिंदे, तत्कालीन चेअरमन विश्वासराव शिंदे, तत्कालीन संचालक निवृत्तीराव भोसले, पांडुरंग धोंगडे, हरी सूर्यवंशी, साहेबराव पाटील, सुभाष धनुरे, सौ निर्मला लेणेकर, तत्कालीन तज्ज्ञ संचालक सुभाषराव गोविंदपुरकर अश्या 10 जणांची नावे आरोपी म्हणून तक्रारीत नमूद आहेत. या अहवालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.