शेंद्रीय भाजीपाला व फळ विक्री केंद्र – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची संकल्पना
धाराशिव – समय सारथी
कायदा सुव्यवस्था बरोबरच नागरिकांच्या चांगल्या आरोग्याचा संकल्प धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केला असुन शेंद्रीय भाजीपाला व फळ विक्री केंद्र सुरु केले आहे.पोलीस कल्याण विभाग अंतर्गत ही संकल्पना मांडली असुन शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीने पिकवलेली फळे व भाजीपाला विकला जाणार आहे, शेतकऱ्यांकडे तसे प्रमाणपत्र असुन त्यांना हक्काचे विक्री केंद्र मिळाल्याने उत्पन्न होणार आहे.
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने धाराशिव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळील सबसिडीअरी कॅन्टीनसमोर सेंद्रीय भाजीपाला आणि फळे विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सदाशिव शेलार,राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे,मोबाईल ऍपचे राहूल सिंग,प्रगतिशील शेतकरी शिवमुर्ती साठे, धनंजय शिंगाडे, टाटा सामाजिक संस्थेचे गणेश चादरे,महेश जमाले, नानासाहेब पाटील, ज्ञानेश्वर धनके आदि उपस्थित होते यावेळी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, येथील भाजीपाला केंद्रात सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला स्वच्छ, रसायनमुक्त ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री होणार असल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला आणि फळे मिळणार आहेत. याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले.
पर्यावरणप्रेमी पोलीस अधीक्षक
पर्यावरणप्रेमी अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले आहेत. जिल्ह्यातील वनसंख्या लक्षात घेऊन त्यांनी आजपर्यंत धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम तालुक्यात स्वतः वृक्ष लागवड करून नागरीकांना पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले आहे. तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढावी म्हणून विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरण अशी कामे केली आहेत. त्यांच्या या कामाचे धाराशिव जिल्हावासीयामधून कौतुक होत आहे.
फळझाडांच्या लागवडीस प्राधान्य
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव तालुक्यातील वरवंटी, कळंब तालुक्यातील येरमाळा, भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे वृक्षारोपण करताना फळझाडांच्या लागवडीस प्राधान्य दिले. त्यामुळे आज या झाडांची जपणूक तेथील ग्रामस्थ देखील स्वतःहुन करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे आता दिसून येत आहे.