कुटुंब उद्ध्वस्त – कधी लाख रुपये जिंकत तर दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांचे नुकसान
बार्शी – समय सारथी, धीरज शेळके
बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात ऑनलाइन गेमच्या व्यसनाने एका तरुणाने आयुष्य संपवले आहे. चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने समाधान तुकाराम ननवरे (वय 32) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा ऑनलाइन गेमच्या विषारी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान ननवरे हे गेल्या सात वर्षांपासून बार्शीतील शिवाजीनगर भागात ‘डायमंड सलून’ या नावाने व्यवसाय करत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांना मोबाईलवरील चक्री गेमचे व्यसन लागले. सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून सुरू झालेला हा गेम नंतर जुगाराच्या व्यसनात परिवर्तित झाला. तो रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असे, ते कधी लाख रुपये जिंकत, तर दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांचे नुकसान करत असे.
या व्यसनामुळे समाधानने मित्र, नातेवाईक, पतसंस्था, बँका आणि खासगी सावकार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतले. इतकेच नव्हे तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही कर्ज घेऊन त्याने गेममध्ये पैसे गुंतवले. घरच्यांनी वारंवार समजावून सांगूनही तो थांबला नाही.
समधानची पत्नी व मुलगा दिवाळी निमित्त ढोकी येथे माहेरी गेली होती त्यानंतर 24 ऑक्टोबरच्या रात्री त्याने आई व बहिणींसोबत जेवण केले आणि गप्पा मारून साडेअकराच्या सुमारास दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. पहाटे आई सीताबाई ननवरे उठल्या असता पाणी तापवण्यासाठी जाताना समाधानने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर घरच्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
समाधानच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा आणि तीन बहिणी असा परिवार आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांची हृदयविकाराची शस्त्रक्रिया पार पडली असून, उपचारांसाठी त्यांनी मोठं खर्च केला होतं. समाधान यास शेतीजमीन नसल्याने आणि समाधानच घरातील मुख्य आधार असल्याने, त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं आहे.
यात अधिक वेदनादायक बाब म्हणजे, समाधानची पत्नीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील आहे. तिचे स्वतःचे आई-वडील आणि भाऊ नाहीत. त्यामुळे तिच्या पाठीशी आता कोणीच उरलेले नाही. छोट्या मुलासह हे संपूर्ण कुटुंब सध्या पूर्णतः असहाय अवस्थेत आहे.
पूर्वीच घातली होती ऑनलाइन गेमवर बंदी — तरीही नवे मार्ग सुरू
धाराशिवसह राज्यात याआधीही अशाच प्रकारच्या आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर विधानसभेत आमदार कैलास पाटील आणि लोकसभेत खासदार ओमराजे निंबाळकर सह अनेक लोक प्रतिनिधींनी ऑनलाइन गेमिंगविरोधात जोरदार आवाज उठवला होता. यावर सरकारने काही अंशी बंदी जाहीर केली होती.
मात्र, प्रत्यक्षात या गेमचे नवे अवतार आता “नावे बदलून” आणि “स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून” सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेम खेळण्यासाठी आवश्यक असणारे युजर आयडी स्थानिक एजंटकडून सहज मिळतात. त्यामुळे तरुणाई पुन्हा या डिजिटल जुगाराच्या आहारी जात असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
ही घटना केवळ एका घरातील शोककथा नाही, तर समाजासाठी इशारा आहे.












