धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या विळख्यात अडकली असुन लाखो रुपये बुडाल्याने आर्थिक बरबादी झाल्यावर आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात, धाराशिव तालुक्यातील बावी येथील तरुणाने मुलासह पत्नीला विष पाजून आत्महत्या केली. राज्यभरात असे प्रकार घडले असुन आमदार कैलास पाटील यांनी याबाबत विधीमंडळात आवाज उठवला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. केंद्र सरकारच्या अंतर्गत हा विषय येत असुन यावर ठोस कायदा करणे गरजेचे असुन याबाबतराज्य सरकार पाठपुरावा करीत आहे.
धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाइन रमी व गेमच्या विळख्यात अडकलेल्या 28 वर्षीय लक्ष्मण जाधव युवकाने पत्नी तेजस्विनी व दोन वर्षांच्या मुलाला विष पाजले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना 15 जुन रोजी घडली. हा तरुण तब्बल 30 ते 40 लाख रुपयांना आर्थिक बुडाला त्यातून अख्खे कुटुंब संपविले. ही घटना आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडली व ऑनलाईन गेमवर राज्य सरकारने कायम स्वरूपी बंदी घालावी व तसा ठोस कायदा तयार करावा अशी मागणी केली.
गेल्या 4 वर्षांपासून हा ऑनलाईन गेमचा रोग वाढत असुन ही एक गंभीर समस्या बनली आहे, या गेमचे सर्व्हर हे देशात व इतर देशात असते, यावर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असुन राज्य सरकार याबाबत पाठपुरावा करीत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले