धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांचे बेमुदत मुंबई येथील उपोषण सुरु आहे, या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर करीत भुमिका स्पष्ट केली. त्यानंतर ओमराजे यांनी पावसात भिजणाऱ्या बांधवाना गुप्तरित्या 20 हजार रेनकोट वाटप केल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली त्याबाबत ओमराजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा आरक्षण आंदोलन स्वयंस्फूर्तीने चालू असुन मराठा आरक्षण आंदोलनासाठी मी मदत केल्याच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची माझी सवय नाही. ज्या कुणी अज्ञात व्यक्तींनी किंवा संस्थेने मुंबईच्या मराठा आंदोलना साठी मदत केली असेल त्यांचे अतिशय मनःपुर्वक आभार त्यांनी मानले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा नसून शिक्षण, नोकरी व सामाजिक न्यायासाठीची लढाई आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. शासनाने वेळोवेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत, यामुळे समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.मनोज दादांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे. आज आझाद मैदानावर सुरू असलेले हे उपोषण हा फक्त आंदोलनाचा टप्पा नसून, मराठा समाजाच्या भवितव्यासाठीची ऐतिहासिक लढाई आहे असे ओमराजे म्हणाले.
मराठा आरक्षण लढ्याला आम्ही ठाम पाठिंबा देत असून, शासनाने तातडीने आपले आश्वासन पूर्ण करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. अन्यथा समाजातील असंतोष अधिक तीव्र होईल याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी ठेवावी असा इशारा दिला