रडू नको ‘बाळा’, नादी नको लागु – बदा बदा बडवीन ‘मल्हार पाटील बोलते’ – बिगुल वाजला
धाराशिव – समय सारथी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आणि त्यांचे समर्थक आमने सामने पहायला मिळाले. नादी नको लागु बाळा, रडू नको बाळा या गाण्यावर ‘कसायं दणका’ ‘मल्हार पाटील बोलते’ या शीर्षकाखाली ‘बाळा’ असे हिनवत रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे, राहुल काकडे यांच्यासह एकेकाळी ओमराजे यांच्यासोबत असलेले माजी नगरसेवक अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने यांनी गाणी म्हणत, नाचत व दंड थोपटून भाजपच्या ‘शिस्तबद्ध’ गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेच्या व्यासपिठावरून ओमराजेंना थेट आव्हान दिले. ओमराजे मात्र संपूर्ण प्रसंग शांतपणे पाहत स्मितहास्य करत प्रतिसाद देत होते. शिस्तबद्ध मिरवणुकीचे व्यासपीठ राजकीय आखाडा बनल्याचे गणेश भक्तांना पाहायला मिळाले.
धाराशिवच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मल्हार पाटील यांच्या राजकारणाची झलक व धमक पाहायला मिळाली, यापुर्वी देखील लोकसभा निवडणुकीसह अन्यवेळी ओमराजे व मल्हार पाटील आमने सामने आले होते, त्यांनी एकमेकांना शाब्दिक प्रहार केले होते. गणेश उत्सवात मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात दंड थोपटून ओमराजेंना थेट आव्हान देताना दिसले. शक्तीप्रदर्शन पाहून दुसरीकडे ओमराजे एकटे उभे राहून या प्रसंगाकडे शांत पाहताना दिसले तर आमदार कैलास पाटील यांनी शांततेची भुमिका घेतली.
आमनेसामनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात “नादी लागु नको, तुला ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडवीन” या गाण्याच्या तालावर पाटील समर्थकांचा जल्लोष ऐकायला मिळाला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या रिल्स व्हायरल केल्या जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील राजकारणाचा बिगुल यानिमित्ताने वाजवला. धाराशिव शहरात गणेश विसर्जन मिरवणूक गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात शांततेत पार पडली.