धाराशिव – समय सारथी
सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांचा आव आणत गावात अवैध दारूविक्री बंद करण्याचे निवेदन देणाऱ्या तथाकथित समाजसेवकांचा खरा चेहरा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असुन निवेदन देणारे सायंकाळी एका अड्यावर जुगार खेळताना पोलिसांच्या छाप्यात सापडले. निवेदन देणारे स्वतःच 12 तासाच्या आत जुगार खेळताना अडकले असल्याने खळबळ उडाली आहे, धाराशिव जिल्ह्यातील कदेर येथील ही घटना असुन उमरगा पोलिसांनी ही कारवाई केली.
उमरगा तालुक्यातील कदेर व सेवानगर तांडा येथे सुरू असणारी अवैध दारूविक्री, जुगार बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे एक निवेदन रोहित चव्हाण, आकाश राठोड, शरद आडे, सुमित चव्हाण, सचिन चव्हाण व तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी उमरगा पोलिसांकडे दिले होते. याअनुषंगाने पलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह कदेर, सेवानगर भागातील जुगार, दारूविक्रीची माहिती काढून त्याच दिवशी कारवाईला सुरुवात केली.
सायंकाळी चार ठिकाणी पोलिस पथकाने छापे टाकले. यात आरोपी वसंत राठोड याच्याकडून 65 लिटर, शिवाजी राठोड याच्याकडून 70 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. सेवानगर तांडा कदेर येथील गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर छापा मारून तिरट जुगार खेळणारे रोहित राजेंद्र चव्हाण, आकाश दिलीप राठोड, अशोक नीळकंठ पवार, गुलाब भिल्लू चव्हाण, अनिकेत भगवान राठोड, कमलाकर हिरा जाधव, अजय विठ्ठल पवार, जयसिंग लालू राठोड यांना पकडण्यात आले.
लक्ष्मी मंदिरासमोर केलेल्या कारवाईत तानाजी भोजू बनसोडे, प्रमोद हणमंत कोराळे, सचिन बलभीम भाले, संतोष राम बनसोडे, रमेश रानबा बनसोडे, अरुण तात्याराव बनसोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,या सर्वांवर उमरगा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, पोउपनि गजानन पुजरवाड, सपोफौ प्रदिप ओव्हळ, पोहेक कोनगुलवार, पोना अनुरूद्र कावळे, पोका नवनाथ भोरे, पोकों बाबासाहेब कांबळे यांनी केलेली आहे