धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजना (राज्यस्तर) अंतर्गत धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांचे 59 डीपी रस्ते करण्याचे कंत्राट ठेकेदार अजमेरा यांना देण्याचा घाट रचला जात आहे. ठेकेदार अजमेरा यांनी निविदा दराने काम करण्यासाठी सहमती दर्शवल्याने त्यांना काम द्यावे अशी शिफारस राज्य स्तरीय तांत्रिक समितीने केली आहे, त्यामुळे आता त्यांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. दरम्यान निविदा व इतर कायदेशीर कागदपत्रे पूर्तता करण्यात येणार असुन त्यानंतर निर्णय घेऊ असे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सांगितले आहे.
धाराशिवची जनता, शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात दुःखी असताना टेंडररुपी ‘लोण्याचा गोळा’ खाण्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झीजवून ‘सुसंस्कृत’ नेतृत्वाने हा ‘डाव’ साधला आहे हे विशेष. अजमेरा यांना हे काम मिळावे यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एक नेतृत्वने सर्व ‘शक्ती’ पणाला लावली आहे. ‘दलाली’ नव्हे तर तेथे ‘भागीदारी’ असल्याने इतका जीवाचा ‘आटापिटा’ केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
अजमेरा यांना 140 कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर 15 टक्के जास्तीच्या दराने मंजुर झाले होते, यामुळे नगर परिषदेला अधिकचे 22 कोटी द्यावे लागणार होते, मात्र शिवसेना उबाठा, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व नेते यांनी उपोषण, आंदोलन केल्याने पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय झाला व नगर परिषद अर्थात जनतेचा 22 कोटी वाचले, हे मात्र उघड सत्य. 22 कोटी वाचल्याचे श्रेय आंदोलक, महाविकास आघाडी व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना द्यायला हवे.
वाटाघाटी वेळी निविदा दराने काम करा असे ठेकेदार यांना सांगितले मात्र त्यांनी तयारी दर्शवली नाही, त्यामुळे टेंडर रद्द करून पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय झाला. पुन्हा निविदा निघणार असल्याचे कळताच ठेकेदार यांच्या पायाखालील वाळू सरकली व आहे त्या निविदा दराने ते काम करण्यासाठी तयार झाले, तसे पत्र त्यांनी मुख्याधिकारी अंधारे यांना दिले ते त्यांनी पुढील कारवाईस्तव सादर केले. अजमेरा यांच्या पत्राच्या आधारे त्यांना पुन्हा काम देण्याचा घाट घातला जात आहे. तात्काळ वर्क ऑर्डर मिळावी यासाठी अंधारे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. काहींनी या प्रकरणाचा ‘धस’का घेतला आहे.
धाराशिव शहरातील 140 कोटींचे 59 डीपी रस्त्याचे कामाचे टेंडर 15 टक्के जादा दराने मंजुर करण्याचा घाट रचला होता, त्यामुळे 22 कोटी नगर परिषदेचे नुकसान होणार होते मात्र तो पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी हाणून पाडत 17 सप्टेंबर रोजी घोषणा केली होती की, या कामाची पुन्हा नव्याने फेरनिविदा काढावी. त्याबाबत त्यांनी नगर परिषद अधिकारी यांना आदेशीत केले, त्यानंतर नेतृत्वाने चक्रे फिरवली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजना (राज्यस्तर) अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे योजनेकरिता प्राप्त L1 निविदा ही अंदाजपत्रकीय दरापेक्षा 15% जास्त दराने प्राप्त असून कंत्राटदार यांच्याशी अंदाजपत्रकीय दराने काम करणे करिता वाटाघाटी कराव्यात. कंत्राटदार अंदाज पत्रकीय दराने काम करण्यास तयार नसल्यास फेर निविदा मागविण्यात याव्यात असे आदेश सह आयुक्त संजय काकडे यांनी दिले होते त्यावेळी अजमेरा यांनी नकार दर्शवला मात्र सर्व प्रयत्न संपल्यावर त्यांना ‘साक्षात्कार’ झाला आणि आहे त्या दराने काम करण्याचे पत्र दिले. आहे ते तरी पदरात पडावे यासाठी खटाटोप सुरु आहे.
धाराशिव शहरातील 59 प्रमुख डीपी रस्ते व नाली कामे मंजुर करण्यासाठी 140 कोटीच्या प्रकल्पास 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी मिळाली. त्यानंतर 7 दिवसात निविदा काढणे व 3 महिन्यात कार्यादेश देऊन 91 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे बंधनकारक होते. ही कामे 18 महिन्यात पुर्ण केली जाणार होती मात्र दीड वर्ष होत आले तरी निर्णय झाला नाही. रस्ते विकास प्रकल्पसाठी 119.49 कोटी रुपये राज्य सरकार देणार असुन नगर परिषदेला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग म्हणून 21 कोटी रुपये लोकवाटा द्यायचा आहे.