धाराशिव – समय सारथी
विविध विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गहाळ करुन अपहार प्रकरणाचा तपास आनंद नगर पोलीस यांच्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे तपासाला आता गती मिळण्याची आशा आहे.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेला आदेश तब्बल महिनाभराचा टपाली प्रवास करुन अखेर उपविभागीय कार्यालयात धडकला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी यलगट्टे हे सध्या धाराशिव येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असुन या गुन्ह्यातील आरोपी बोर्डे व पवार हे फरार आहेत.
6 जुलै 2020 ते 21 नोव्हेंबर 2022 या 28 महिन्यात 27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाला असुन तो दडवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांनी संगनमत केल्याची तक्रार नगर परिषदेने दिली होती त्यानंतर कलम 420,409,201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेतील तक्रारी अनुषंगाने चौकशीची मागणी केली होती याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली त्यात करोडो रुपयांची प्रमाणके गायब असल्याचे समोर आले. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने नगर परिषदेतील या अपहाराचा पाठपुरावा केला होता.
चौकशी समितीच्या अहवालानुसार 1 हजार 88 प्रमाणके गायब होती त्यात शासकीय देयके, विद्युत देयके, शासकीय कर, लाभार्थी,जाहिरात बिले, वेतन मानधन व इतर कर असे शासकीय खर्च केलेले 574 देयके आणि ठेकेदार, विकास योजना व किरकोळ खर्चाची 514 देयके अशी वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात आला, यातील अनेक देयके गायब आहेत तर अनेक विकास कामे निकृष्ट आहेत त्यामुळे कर्मचारी व ठेकेदार रडारवर आहेत.