धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या बोगस गुंठेवारी घोटाळ्यात तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना मुख्याधिकारी वसुधा फड पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या गुन्हे नोंद करण्याच्या आदेशाचे पालन करीत नसल्याने फड यांना सहआरोपी करावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे दिली आहे.जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा अहवाल मागावीला आहे.
नगर परिषदेत गुंठेवारीची मंजुर 1 हजार 413 प्रकरणे तपासण्यात आली त्यात जवळपास 135 प्रकरणात बोगस गुंठेवारी करण्यात आली असुन त्यात अनेक बड्या राजकीय हस्तींचा व लोकांचा समावेश आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस व माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी दिलेल्या 2 वेगवेगळ्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करुन 2 वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत त्यावर जिल्हाधिकारी यांनी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 166 व 409 प्रमाणे फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
फड यांना जिल्हाधिकारी यांनी अंतीम नोटीस बजावली होती त्यात त्यांनी एक महिन्यात कारवाई करुन अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र महिना उलटून गेला तरी फड यांनी कारवाई केली नाही त्यामुळे आता त्यांना सहआरोपी करावे अशी मागणी केली आहे.
गुंठेवारी करताना भुखंडाचे सर्वे नंबर मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसणे, खुली जागा म्हणजे ओपन स्पेस न सोडणेसह वर्ग 2 जमिनीच्या क्षेत्रावर गुंठेवारी करणे, सेवानिवृत्त झाल्यानंतरही गुंठेवारी संचिकावर सही करणे, निश्चित केलेले सुधारित विकास शुल्क न आकरणे असे प्रकार घडले आहेत.नगर परिषदेच्या आरक्षणात गुंठेवारी मंजुर केली आहे.
बायोमायनिंग घोटाळा चौकशी अंतीम टप्प्यात –
बायोमायनिंग प्रकल्प तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे,नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या काळात ही योजना राबविली असुन कचऱ्यापासून खत निर्मिती न करता करोडो रुपयांचे बिल ठेकेदार यांना देण्यात आले आहे. यलगट्टे यांनी काही लाखांचे बिल दिले आहे, हेही प्रकरण लवकरच अंतीम टप्प्यात येईल. पुणे येथील सीओईपीच्या पथकाने घटनास्थळी येत पाहणी केली आहे त्यांचा अहवाल आल्यावर अनेक बाबींचा उलघडा होऊन कारवाईची दिशा स्पष्ट होईल.