अन्यथा आंदोलन, तुळजापूर शहर बंदचा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा इशारा
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तीर्थक्षेत्र तुळजापूर व पुजारी याची बदनामी करण्याचे व्यापक षड्यंत्र रचले जात आहे. काही घटक सातत्याने जाणीवपूर्वक ड्रग्ज प्रकरणावरून बदनामी करीत आहेत. या बदनामीच्या षडयंत्राचा छडा लावुन कारवाई करावी या मागणीसाठी तुळजापूर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून चर्चा करुन निवेदन दिले. शिष्टमंडळात सचिन रोचकरी, निलेश रोचकरी, आनंद कंदले, शांताराम पेंदे, संदीप गांगणे, राजेश्वर कदम, बाळासाहेब भोसले, नानासाहेब डोंगरे, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, रामचंद्र रोचकरी, इंद्रजीत साळुंके यांचा समावेश होता, याबाबत एक सविस्तर निवेदन दिले त्यावर यांच्या सह्या आहेत. बदनामी नाही थांबली तर येणाऱ्या काळात आंदोलन, तुळजापूर शहर बंदचा इशारा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी माध्यमाशी बोलताना दिला. यानिमित्ताने ड्रग्जसारख्या विषयात ‘तो’ षडयंत्रकारी व पेड न्यूज पत्रकारितेचा जनक कोण? हे समोर येणे गरजेचे आहे.

बदनामी प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांची चौकशी करून त्यांचे कॉल रेकोर्ड, वॉट्सपवरील कॉल व आर्थिक व्यवहार तपासून याला कोण पाठबळ दिले? पेड न्यूजचा प्रकार आहे का याची चौकशी करावी व संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. काही तथाकथित सामाजिक कळवळा असलेले लोक व काही पत्रकारांनी जाणीवपूर्वक रोज हे प्रकरण चर्चेत ठेवले आहे. यासाठी त्यांनी वारंवार निवेदन देणे, पत्रकार परिषदा घेणे, खोट्या बातम्या प्रसारित करणे. आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया घेऊन त्याबाबत वृत्त प्रसारित करणे असे प्रकार टप्प्याटप्याने चालवले आहेत असे त्या निवेदनात नमुद केले आहे. मागील 2 महिन्यापासुन हे सुरु आहे, हे तपासा अशी मागणी आहे.
तुळजापूर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथे सापळा रचून विक्रीसाठी आणले जात असलेले ड्रग्ज पकडले होते.त्यानंतर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची उकल करत मुंबई पासून असलेले लागेबांधेही शोधून काढले आहेत. असे असताना काही तथाकथित पत्रकार व तथाकथित सामजिक कार्यकत्यांनी तथ्यहीन बातम्या प्रसारित करून त्या व्हॉट्स अप सह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करुन बदनामी केले याचा छडा लावा असेही निवेदनात म्हटले आहे.
सुरुवातीला तुळजापूर शहरात दीड ते दोन हजार युवक ड्रग्ज सेवन करत असल्याची धादांत खोटी बाब वारंवार चर्चेत आणली गेली परिणामी निष्पाप युवकांची नाहक बदनामी झाली आहे व राज्यभरात त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे त्यामुळे अनेकांच्या मनात नैराश्याची भावना तयार झाली आहे. आणखी एक मुद्दा यात मांडला आहे. “आदेश- ड्रग्ज तस्करीतील आरोपी पुजाऱ्यांवर होणार ही कारवाई, तुळजाभवानी मंदिर प्रशासन ऍक्शन मोडवर” अश्या मथळ्याखाली पुजारी वर्गाशी संबंधित वृत्त समाजमाध्यमातून पसरविले गेले आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडून खातरजमा केली असता असे काहीही घडले नसल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकपणे ड्रग्ज प्रकरणांमध्ये कायम तीन पुजारी मंडळाने पुढाकार घेऊन हे प्रकरण उचलून धरलेले आहे. तरीदेखील पुजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.