धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील नुतन पोलिस अधीक्षक कार्यालय इमारत व पोलिसांसाठी बनविण्यात आलेल्या 244 सदनिकांचे (फ्लॅट) उद्या18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उदघाट्न होणार आहे. नुतन पोलिस अधीक्षक कार्यालय व सदनिका हे धाराशिव जिल्हा पोलिस दलाचे गेल्या अनेक दशकापासूनचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण होणार आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने ही इमारत व सदनिका प्रकल्प पुर्णत्वास आला असुन या देखण्या व सर्वसुविधा संपन्न इमारतीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.
धाराशिव येथील नुतन पोलिस अधीक्षक इमारत ही सज्ज असुन यात पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शस्त्रागार, आस्थापना, सायबर पोलिस, वाहतुक यासह सर्व शाखांची प्रशस्त कार्यालये असणार आहेत.
18 जुलै रोजी नुतन इमारत व सदनिका प्रकल्पाचे उदघाटन होणार असुन साठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत तर मुख्य सचिव सुजाता सौनिक,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर पोलिस महासंचालक गृहनिर्माण अर्चना त्यागी,विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची विशेष उपस्थितीती असणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावे असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी केले आहे.