नव्या रिंगरोडमुळे कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी होणार उपयोग
ओजोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वेळेत केले उत्कृष्ट काम
सोलापूर – समय सारथी
सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम २०२२ पासून सुरू होते ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. २०२४ या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना हे नवं गिफ्ट मिळालं आहे.
रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा ४५ किलोमीटरच्या रिंग रूटची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूरच्या हद्दीतील एकूण ५ विभाग शहराशी सहजपणे जोडण्यासाठी या रिंगरोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडचे काम ओजोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने कमी वेळेत उत्तमरित्या केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. या रिंग रोडमुळे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मधील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शेतमालाच्या वाहतुकीसह दळणवळणाचे साधन ग्रामीण भागात जलद गतीने पोहोचण्यासही मोठा उपयोग होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डी अशी अनेक गावे सोलापूर शहराशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम गेल्या वर्षी २० मे २०२३ रोजी कंपनीला देण्यात आले होते. ते काम ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग सुरू करून नवीन वर्षाचं गिफ्ट लोकांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती ओजोनलँड कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह यांनी दिली.
प्रकल्पामध्ये २-लेन/४-लेन महामार्ग तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि पुनर्वसन, सध्याच्या महामार्गालगत चांगले फूटपाथ बांधणे इत्यादींचा समावेश आहे. या नव्याने विकसित झालेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे केवळ लोकांची हालचाल सुधारणार नाही तर कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी चांगल्या वाहतूक व्यवस्थेद्वारे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करेल. याशिवाय या चांगल्या रस्त्यांचे जाळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यास मदत करेल असंही ओजोनलँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०२४ मध्ये सोलापूरकरांना मिळालेल्या या गिफ्टमुळे सोलापूरकर देखील आनंद व्यक्त करत आहेत.