धाराशिव – समय सारथी
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज तुळजापूरात येणार असून ते मंदिर परिसर व जीर्णोद्धार कामाची पाहणी करून पुजाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तुळजा भवानी मातेचे मंदिर शिखर (कळस) पाडून जो मंदिर संस्थान विकास करणार आहे त्याला त्यांचा विरोध असून ते आवाज उठविणार आहेत. जुन्या वास्तुंचे जतन व संवर्धन करून विकास साधावा अशी त्यांची धारणा आहे. पुढच्या पिढीला जुन्या वास्तु पहायला मिळणार नाहीत, त्यांना जुना इतिहास देखील कळणार नाही अशी भुमिका आहे. ते दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे अशी माहितील भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम यांनी दिली आहे.
तुम्हाला जे करायचे ते करा पण, मुख्य मंदीरातील देवाला आणि गाभरातील एकाही दगडाला हात लावू नका, कारण हे पाप आहे. माझी काही पुजाऱ्यांशी चर्चा झाली. मी त्यांना भेटण्यासाठी तुळजापुरला जाणार आहे. गावात असंतोषाचे वातावरण आहे. मी अनेक वेळा तुळजापुरच्या देवीचे दर्शन घेतले असून तिचा मी मोठा भक्त आहे. मी कुणाला सांगून किंवा ढोल तशा घेऊन जात नाही. ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे, ती आहे त्या जागेवरच राहीली पाहिजे. ज्या जागेवर शिवरायांनी तिचे दर्शन घेतले ती पवित्र जागा आहे. मंदिराच्या एकाही दगडाला हात लावू नका. कारण मंदीराच्या प्रत्येक दगडातील अणू रेणूत देवी बसली आहे. इथे धर्म येत नाही तर, ही आमची श्रद्धा आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.