नवीन तहसीलचे भूमिपूजन – नळदुर्गला अपर तहसील कार्यालय कार्यान्वित
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर आणि नळदुर्ग शहर व परिसरात विकासाची गंगा येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे तुळजापूर तालुक्याचा प्रचंड वेगाने विकास होणार आहे. ‘हा केवळ विकासाचा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’, आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळजापूर येथील तहसील कार्यालयाच्या नवीन तहसील इमारतीचे भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नळदुर्ग येथे शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयाचा शुभारंभही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलत होते.
तुळजापूर येथील कार्यक्रमात आमदार पाटील म्हणाले की, तीर्थक्षेत्र तुळजापूरला साजेशी भव्य नवीन तहसील इमारत निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरी सेवा-सुविधा मिळणे अधिक सुलभ होणार आहे. उत्तम व वेगवान सुविधा आणि सेवेसाठी तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था मजबूत व्हावी, यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करण्यावर भर दिल्याने आपल्या मतदारसंघाची आदर्श आणि विकसित क्षेत्र म्हणून वाटचाल होत आहे.
नळदुर्ग येथील अपर तहसील कार्यालय शुभारंभप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, नळदुर्गला अपर तहसील होणे फार गरजेचे होते. नळदुर्ग हा तालुका होण्याच्या दृष्टिने हे महत्वाचे पाऊल आहे.तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची अतिरिक्त तहसीलदार उद्याच नेमणूक करण्यात येणार आहे.नळदुर्ग, होर्टी येथे एमआयडीसी उभारून त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग आणून स्थानिकांच्या हाताला काम देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. नळदुर्ग येथे कृषी उत्पन्न बाजार समिती होण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यापुढील कार्यवाही देखील लवकरच पूर्ण केली जाणार आहे. शहराला स्वच्छ पाणी, 24 तास पाणी मिळणार आहे. एकंदरीत तुळजापूर आणि नळदुर्ग शहरांच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाचाही विकास होण्यासाठी आपण महायुती सरकारला ताकदीने साथ देणे अपेक्षित असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शफीभाई शेख यांनी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात विकासकामे करून दाखविण्याची धमक आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच नळदुर्ग हा तालुका व्हावा. तसेच तुळजापूर आणि नळदुर्ग दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे आमदार पाटील यांच्या पाठीशी नळदुर्गची जनता कायम सोबत असेल, असा शब्द शेख यांनी दिला. यावेळी भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.