धाराशिव – समय सारथी
येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणुन काम करणाऱ्या मुकुंद कसबे मृत्यूचं कोडं सोडवण्यात पोलिसांना यश आले असुन एका आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात 2 वेगवेगळ्या कहानी समोर आल्या असुन पहिल्यादा अकस्मात मृत्यू तर त्यानंतर 15 महिन्यांनी तो ‘अपघात’ असल्याचे नमुद करीत 2 वेगवेगळे गुन्हे नोंद केले होते. मात्र अखेर या मृत्युंच कोडं सुटले असुन हॉटेल मालक राहुल देशमुखे याला आनंदनगर पोलिसांनी अटक केली आह, आज आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे.
देशमुखे याला कलम 304 ( मृत्यू मात्र ठरवून केलेला/हेतुपूर्वक खुन नव्हे ) 201 ( पुरावा नष्ट करणे ) या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कसबे प्रकरणात देशमुखे तक्रारदार होता मात्र तोच आता आरोपी बनला आहे. या प्रकरणात पुरावे दडवून आरोपीला पाठीशी घातल्याची माहिती कळताच दैनिक समय सारथी वृत्तपत्राने पाठपुरावा केला होता, त्या पाठपुराव्यानंतर यातील ‘सत्य’ समोर आले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यातील हा तपास आनंद नगर पोलिसांकडे वर्ग केला होता त्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिस अधीक्षक शफकत आमना, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तपास करून मृत्यूचं कोडं व गुढ उकलत आरोपीला अटक केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांचा कायदेशीर अभिप्राय महत्वाचा ठरला. दडवलेले पुरावे, जबाब, वैद्यकीय कागदपत्रे यासह अन्य बाबीचा तपास करून पोलिस निरीक्षक खांडेकर यांनी गुन्ह्याची उकल केली.
21 मार्च 2024 रोजी येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटर मुकुंद माधव कसबे (रा मोहा, ता कळंब) हा काम करीत होता. काम करीत असताना ढाब्यासमोर सिमेंट काँक्रेटवर पडून कानातुन रक्त आल्याने त्यास रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व 23 मार्चला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला अशी तक्रार राहुल बाळासाहेब देशमुखे यांनी दिली त्यावरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची मयत क्रमांक 17/24 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली. त्यावेळी कोणावरही संशय तक्रार नसल्याचा जबाब हॉटेल मालक राहुल देशमुख यांनी दिला.
देशमुखे यांना घटनेच्या तब्बल 1 वर्ष 3 महिन्यांनी साक्षात्कार झाला व त्यांनी धाराशिव ग्रामीण पोलिसात 2 जुन 2025 रोजी फिर्याद दिली की, मला आज रोजी ढोकी येथील धनराज किसन कांबळे यांचेकडुन माहिती झाले की, मुकुंद कसबे हा ढाब्यासमोरील उड्डाण पुलाजवळ लातुर ते बार्शी रोडवर गेला असताना बार्शीकडुन येणारे एका मोटर सायकलने त्यास जोराची धडक दिली त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर तो पडलेल्या ठिकाणाहुन उठून ढाब्याकडे चालत आला व काँक्रेटच्या कोब्यावर पडल्याने कानातून रक्त आले. त्यावेळी मला तो काँक्रेटवर पडल्याने रक्त येऊ लागले असे वाटल्याने मी व लक्ष्मण जाधव त्यास दवाखान्यात घेऊन गेलो व उपचारानंतर त्याचा मृत्यु झाला म्हणुन भादवी कलम 304 अ, 279 व मोटार वाहन नियम 187 प्रमाणे 2 जुन 2025 ला गुन्हा नोंद केला.
कलम 174 च्या अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास करुन ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांनी अंतीम अहवाल मंजुरीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पाठवला, तो नाकारत उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी काही प्रश्न निर्माण केले त्यातच या मृत्युंच ‘गुढ’ व ‘कोडं’ वाढल आणि शेळके यांच्यासह अन्य जन आरोपीना हेतूत जाणीवपूर्वक पाठीशी घालणे, पुरावे दडपून ठेवत त्याच्याशी छेडछाड केल्याने अडचणीत येण्याची शक्यता आले आहेत, या प्रकरणात त्यांची चौकशी प्रस्तावित केली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
कसबे याच्या वैद्यकीय उपचाराच्या कागदपत्रामधील 6 पाने समोर येऊ दिली नाहीत. कसबे यांच्या उजवा व डावा हात, खांद्यावर, पिंडरीवर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने डोळ्यात रक्त होते असे पोस्टमार्टममध्ये नमुद असताना अंतीम अहवाल पाठवला आणि त्यातच ‘बिंग’ फुटले.