डॉ पाटीलांसाठी पवनराजेंनी खुप काही केले, अपराधीपणाची भावना नाही – मी तसली वाईट कृती करणार नाही
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे हत्याकांडात न्याय कधी मिळणार? या जन्मात तरी पाटील परिवाराशी असलेले वैमनस्य संपणार नाही, ते मला रडणारे बाळ म्हणतात वडिलांची हत्या झाल्यावर मग हसू काय ? असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थितीत केला. डॉ पाटील मंत्री असताना त्यांच्यासाठी पवनराजेंनी खुप काही केले, रक्ताचे नाते असताना हत्या करूनही त्यांच्यात अपराधीपणाची भावना नाही उलट पैशाची मस्ती आहे. मी न्यायलयीन लढाई लढत असुन मी तसली वाईट कृती करणार नाही, तो विचारही मनात येत नाही असे ते म्हणाले.
पवनराजे हत्या त्यानंतरचा राजकीय संघर्ष, डॉ पाटील परिवाराशी असलेले वैमनस्य व इतर बाबीवर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी ‘माझा कट्टा’ या चर्चासत्रात प्रश्न विचारल्यावर ओमराजे यांनी उत्तरे दिली.
एखाद्या मुलाच्या आई किंवा वडिलांना मारण सोडून द्या, कोणी शिवी दिली तर त्याच्या मनात अनेक वर्ष ते राहते. इथे तर रक्ताच्या नात्यातील जवळच्या माणसाने सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या केली आहे त्यामुळे हे वैमनस्य हे जीवन आहे तोपर्यंत या जन्मात तरी संपणे शक्य नाही. सगळे करून आम्ही काही केले नाही असे ते आव आणुन वागत आहेत, ही कुठली पद्धत आहे, किमान माणुस म्हणुन तरी बघायच्या लायकीचे हे लोक नाहीत.
मला ते रडणारे बाळ म्हणुन हिणवतात, ज्याचा बाप गेला आहे तो रडेल नाहीतर हसेल का? त्यांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप नाही. पवनराजे यांनी डॉ पाटील मंत्री असताना त्यांच्यासाठी खुप काही केले आहे, त्यांचे सगळे खालचे काम पवनराजे पाहत होते. पद्मसिंह पाटील व पवनराजे यांचे वडील सख्खे भाऊ असुन ते पाटील कुटुंबाला दत्तक गेले आहेत, ते राजेनिंबाळकर आहेत. इतकं जवळचे नाते असताना हे केले.
त्यांच्यात अपराधीपणाची भावना नाही, आपलं चुकलंय हे तरी वाटतंय का? पैशाच्या माजावर मस्तीवर अतिरेक सुरूच असतो. मी तसली वाईट कृती करणार नाही, तो विचार सुद्धा मनाला शिवत नाही. मी न्यायीक मार्गाने झगडत आहे. न्यायव्यवस्थेचे दुर्दैव पहा, 2006 साली हत्या झाली, तेव्हापासुन 20 वर्ष झाली तरी मला न्याय मिळत नाही, हत्येचा निकाल येत नाही. माझा लहान भाऊ डॉ जयराजे हे प्रत्येक तारीख नं चुकता हजर असतात. कायम स्वरूपी कोर्टात असतात, जी कृती केली ती त्याचा न्याय मिळावा व भविष्यात अश्या स्वरूपाचे कृत्य कोणी करू नये, हा संदेश समाजात जावा हा हेतू आहे.
आम्ही 2-3 वेळेस सुप्रीम कोर्टात गेलो, 2 महिन्यात निकाल द्या असे सांगितले तरी तो लागत नाही. सप्टेंबर अखेर निकाल लावावा असे सुप्रिम कोर्टाने सांगितले मात्र तो लागला नाही, तारीख पुढे सुरु आहे हे किती दुर्दैव आहे. डॉ पाटील हे लोकप्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी विरोधातील खटले लवकर निकाली काढा असे कोर्टाने सांगितले होते, असे असताना माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीला न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचे काय? तो उठून केस तरी दाखल करू शकेल का? असे ते म्हणाले.
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यात 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असुन डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने उर्वरीत युक्तिवाद सादर केला जाणार आहे. सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री तथा तत्कालीन विद्यमान खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी केले आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे. 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे.सर्वोच्च न्यायालयाने वेळेत निकाल द्यावा असे आदेश दिले आहेत.
पवनराजे हत्याकांड तपासात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा व सुपारी दिल्याचा गुन्हा निष्पन्न झाला होता त्याचा स्वतंत्र गुन्हा लातुर पोलिसांत नोंद असुन न्यायप्रविष्ट आहे, अनेक वर्ष हे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. 2009 साली हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही.