धाराशिव – समय सारथी
महसूल मंत्र्याकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर कोणता पोलीस कारवाई करणार ? या कृतीमुळे ड्रग्ज रॅकेट उध्वस्त होणार की सामान्य जनता ? ड्रग्जचं विष गावात पसरत असताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील गप्प का बसले ? विधानसभेत एक शब्दही का बोलले नाहीत असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी करीत तीव्र शब्दात टीका केली आहे. या कृतीमुळे ड्रग्ज रॅकेट उध्वस्त होणार आहे का, की उलट सामान्य जनता उद्ध्वस्त होणार आहे असा प्रश्न निंबाळकरांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केला.
तुळजापूर विकास आराखड्याच्या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी केल्यानंतर टिकेची झोड उठत आहे त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
ड्रग्ससारख्या गंभीर सामाजिक विषयाला राजकीय रंग न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता, म्हणून आम्ही गप्प होतो. पण सत्य झाकून राहत नाही. विनोद गंगणे हा केवळ ड्रग्ज तस्कर नसून तो मटका माफिया आहे. या प्रकरणात आजही 10 आरोपी फरार आहे आणि त्यातच प्रमुख आरोपीचा महसूल मंत्र्यांकडून सत्कार होत आहे. अशा परिस्थितीत कोणता पोलिस कारवाई करणार? या प्रकारात स्थानिक सत्ताधारी आमदाराचा वरदहस्त असल्याचे संकेत आहेत.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांचा कार्यकर्ता गंगणे ड्रग्जच्या व्यसनात अडकलेला होता आणि निवडणुकीपूर्वी त्याला नवी मुंबई व गुजरात येथे व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात आले. म्हणजेच त्यांना त्याचा ड्रग्ज व्यवहारातील संबंध माहिती होता. तरीही त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ दिल्या. हे विष गावात पसरवले जात असताना ते गप्प का होते? त्यांनी याविषयी कधी विधानसभेत एक शब्दही बोलला का?” असा सवाल त्यांनी केला.
गुन्ह्यात अटक झालेल्या आणि जामिनावर असलेल्या आरोपीकडून मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणे हे दुर्दैवी आहे, ही कोणती नैतिकता यामुळे पक्ष आणि कायदा व्यवस्था दोन्ही बदनाम होतात. सत्ता आणि पदाचा वापर करून जर आपण अशा लोकांना जवळ करत असू, प्रोत्साहन देत असू तर आपण समाजाला चुकीचा संदेश देत आहोत. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे आणि लोकशाही मार्गाने अशा नेतृत्वाला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पक्षाला धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला.