धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्स तस्करी रॅकेटचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणात आपण लक्ष घालून हे प्रकरण वॉर रूममध्ये घ्या व यात दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्याचे तात्काळ आदेश द्या अशी मागणी पत्राद्वारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे ओमराजे म्हणाले.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात भाजपसह अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं बोलले जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्र लिहून कार्यवाहीची मागणी केल्याने सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री यांना पत्र लिहले असुन त्यांना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा भेटून ड्रग्ज तस्करी हा विषय सांगणार असल्याचे ते म्हणाले. ड्रग्ज हा काही राजकीय विषय नाही, भावी पिढी वाचवायची असेल तर या मुद्यावर सर्वांनी एकत्र येऊन माहिती पोलिसांना दिली पाहिजे, पोलिस तपासात हस्तक्षेप किंवा कोणीही दबाव टाकू करू नये असे ते म्हणाले. या प्रकरणावर आपले लक्ष असुन ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी आजवर केलेल्या कारवाईचा अहवाल पोलिस अधीक्षक यांना मागितला असुन संसदेत मांडणार असल्याचेही ते म्हणाले.
धाराशिव जिल्हयात ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट कार्यरत असून ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून एमडी ड्रग्सची होणारी वाहतूक व विक्री यावर बंदोबस्त करण्यासाठी व गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी. तपास व भविष्यात उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुकडयांचा नेमणुका करुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशीही मागणी ओमराजे यांनी केली आहे.