खचुन आत्महत्या करू नका, पाठपुरावा करून भरीव मदत घेऊ – खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव – समय सारथी
रात्र वैऱ्याची आहे… मी तुमच्या साथीला खंबीर आहे. हार मानु नका, पुन्हा उभारी घेऊ, सरकारकडे पाठपुरावा करून भरीव मदत घेऊ मात्र खचुन आत्महत्या करू नका असे भावनिक आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ओमराजे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असुन त्यात त्यांनी भावना व्यक्त करीत आपण सोबती असल्याचे म्हणटले आहे.
अतिवृष्टीने सगळीकडे हाहाकार झालेला आहे. या पावसाने आणि पुराने होत्याचे नव्हते केले आहे. तुमचा हक्काचा माणूस म्हणून शक्य तिथे मी धाऊन जात आहे आणि ते माझे कर्तव्य आहे. आपण सर्व या पावसामुळे अतिशय हतबल झालो आहोत, तरी खचलो नाही आणि खचायचे पण नाही. सरकार दरबारी पाठपुरावा घेऊन तुमच्या पदरी भरीव मदत पोहचेल यासाठी माझे प्रयत्न चालूच आहेत आणि ते मदत मिळेपर्यंत चालूच राहतील.
या दरम्यान आत्महत्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढले आहेत म्हणून एक नक्की सांगेल की आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नावर उत्तर नाही. जगात असे कोणतेही संकट नाही…
जे आपण सोडवू शकत नाही. माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या परिवारासाठी तुमचे असणे खूपच गरजेचे आहे. म्हणून कृपया असा विचारही मनात आणू नका.
या संकटात तुम्ही एकटे नाही,तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमच्या बरोबर आहे त्यामुळे असा कोणताही विचार आणू नका.
रात्र वैऱ्याची आहे हे जरी खरे असले तरी मी तुमच्याबरोबर खंबीर पणे उभा आहे, हे ही नक्की आहे. आपण यातून ही उभारी घेऊ फक्त तुम्ही हार मानू नका असे भावनिक आवाहन करीत ओमराजे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चौकट
शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. अतिवृष्टीच्या प्रचंड तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात गेले प्रत्येक कुटुंबाच्या डोळ्यांत भविष्याबद्दलची चिंता आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. या संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी जबाबदारी आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आणि ग्रामस्थांचा विश्वास टिकवून त्यांचा आनंद परत आणण्यासाठी आम्ही सदैव लढा देत राहू असा प्रण केला.