धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे फोन सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्वेच्या अनुषंगाने खणखणत आहेत. हे सर्वेक्षण एका खासगी कंपनीकडुन केले जात असुन धाराशिव लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग केले जात आहे. राजकीय नेत्या ऐवजी सेवानिवृत्त अधिकारी या पर्यायाची चाचपणी या माध्यमातून भाजपकडुन केली जात आहे. मोदी यांनी अश्विनी वैष्णव, एस सुब्रह्मण्यम यासारख्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री केल्याचा दाखला देत या सर्वेतुन मन आणि मतपरिवर्तन केले जात आहे. विशेष म्हणजे प्रवीण परदेशी हे 18 व 19 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ते तुळजापूर, धाराशिव व कळंब या तीन ठिकाणी ते मिशन कर्मयोगी प्रशिक्षण देणार असुन जिल्ह्यातील विविध विकास योजनाचा आढावा घेणार आहेत. सर्वेक्षणाचे फोन व परदेशी यांचा दौरा हा योगायोग आहे की इतर हे कालातराने स्पष्ट होईल.
देशात लोकशाही विषयी जागृती करणे व स्वातंत्रच्या अमृत महोत्सवात नागरिकांना सहभागी करुन घेणे हा हेतु असल्याचे सांगत फोन येतो सर्वेला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत असा नारा दिला आहे असे सांगत पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला भारताच्या रेल्वे मंत्र्याच नाव माहिती आहे का? त्यांना उत्तर माहिती नसेल तर अश्विनी वैष्णव असे सांगा. रेल्वे मंत्री यांचं कोणतं काम महत्वाचे वाटले.अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री बनन्या अगोदर त्याच्या कारकीर्द बाबत आपणास माहिती आहे का ? त्याच्या कोणत्या अनुभवावरून मोदी यांनी रेल्वे मंत्रीपदाची धुरा सोपावली. ते सेवानिवृत्ती आयएएस अधिकारी होते असे त्यांना बरोबर उत्तर सांगा.
मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगाचे नेतृत्व करायला तयार आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्री यांचं नाव काय? त्यांनी उत्तर एस जयशंकर दिले तर बरोबर नसेल तर त्यांना ते उत्तर सांगा.परराष्ट्र मंत्री होण्या अगोदर ते काय करत होते? मोदी यांनी त्यांना कोणत्या अनुभवावरून मंत्री केले. सुब्रहमण्यम जयशंकर हे आयएफएस ( भारतीय परराष्ट्र सेवा ) मध्ये होते असे उत्तर त्यांना सांगा.
तुम्हाला हे समजून आश्चर्य व आनंद वाटेल की मोदींनी अश्या 6-7 अधिकारी यांना मंत्री बनविले आहे, जे त्यांच्या अनुभवाचा उत्तम वापर करीत आहेत.मागील 9 वर्षात मोदींचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे, असे सांगितले जात आहे.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील लातूर किल्लारी भूकंप झाला तेव्हा मदत व पुनर्वसन कार्य कोणत्या जिल्हाधिकारी यांनी केले हे आपणास माहिती आहे का? उत्तर न सांगितल्यास त्यांना प्रवीण परदेशी असे सांगा. परदेशी यांच्या कामाबद्दल काय वाटते. जर एखाद्या अधिकारी याला आपल्या धाराशिव मतदार संघात उमेदवारी मिळाली तर आपण त्यांचे समर्थन करणार का? तुम्हाला असं वाटत का अधिकारी अनुभवाच्या जोरावर चांगले काम करू शकतात.
धाराशिव लोकसभा मतदार संघात एक राजकीय नेता व एक सेवानिवृत्त अधिकारी यांच्यामध्ये निवड करायची झाल्यास कोणाची निवड कराल? एका अधिकाऱ्याची, नेत्यांना बऱ्याच संधी देऊन बघितल / राजकीय नेता किंवा अजुन ठरवलं नाही असे पर्याय दिले आहेत.
वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, निवडणुका जवळ आल्या की आम्ही पुन्हा संपर्क करू असे म्हणत हा सर्वे संपतो. अश्या स्वरुपाचे प्रश्न विचारून उत्तरे विचारली जात आहेत, योग्य उत्तरे माहिती नसतील तर ती सांगून मन व मत परिवर्तन केले जात आहे.
प्रवीण परदेशी यांची माहिती
63 वर्षीय प्रवीण परदेशी हे 1985 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी असुन सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. फडणवीस यांचे ते अत्यंत जवळीक व विश्वासू म्हणून ओळखले जातात, परदेशवारीत देखील ते नेहमी फडणवीसांच्या सोबत असत. मृदु भाषेने ते नेहमी सर्वांशी जवळीक साधून असतात.अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असुन मुख्य सचिव पदाने हुलकावणी दिल्याने ते केंद्रात जाऊन सेवानिवृत्त झाले. मित्रा उपक्रमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी 3 वर्षासाठी त्यांची नेमणूक केली आहे.
लातूर येथील 1993 मधील भूकंप काळात ते जिल्हाधिकारी होते, भूकंपातील पुनर्वसन व जागतिक बँकेकडून मिळालेली मदत यात त्यांचा मोठा वाटा आह. अर्थशास्त्र व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिकस येथे त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना व आर्थिक विकास या विषयात मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण, वित्त, शहर विकास, महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष सेवा केली आहे.भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.
धाराशिव जागा व उमेदवारीसाठी रस्सीखेच…
धाराशिव लोकसभा मतदार संघात धाराशिव, उमरगा, तुळजापूर, भुम या धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्हातील बार्शी असे 6 मतदार संघ येतात. जागा वाटपात महायुती (शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, भाजप) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे गट) यांच्यात रस्सी खेच आहे.सध्या शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार आहेत. सर्वच पक्षांनी आपला जागेवर दावा ठोकला आहे.
खासदार ओमराजे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे राजकीय हाडवैरी असुन एकमेकांचे संस्थान खालसा करण्यात त्यांच्यात नेहमीचे चुरस असते,त्यासाठी ते सर्व ताकत पणाला लावतात हा आजवरचा इतिहास आहे. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान बळकट केले असुन त्याची किंगमेकरची भुमिका व कौल आजवर महत्वाचा ठरला आहे.
मोदी यांच्या चेहऱ्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाला विजय सहज सोपा वाटत आहे तर जनसंपर्क व वक्तृत्व यामुळे ओमराजे यांचे तगडे आव्हान आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा पैकी भाजपच्या मिशन 45 मध्ये धाराशिव नसुन त्यांना या जागेवर विजयाची साशंकता आहे त्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्यास प्राधान्य आहे, त्यासाठी भाजप वेगवेगळे प्रयोग व पर्यायाची चाचपणी करीत असुन त्याचाच हा सर्वे एक भाग मानला जात आहे.भाजप एखाद्या अधिकाऱ्यांला उमेदवारी हा राजकीय डाव ऐनवेळी खेळू शकतो.