सत्ता आमची सुद्धा – गाठ माझ्याशी, योग्य उत्तर देऊ, आमदार तानाजीराव सावंतांची घणाघाती टीका
धाराशिव – समय सारथी
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ आमचा उगाच नाद करू नका, आम्ही बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक आहोत. सत्ता आमची सुद्धा, काही चुकीचे केलात तर गाठ माझ्याशी आहे, योग्य उत्तर देऊ असे म्हणत आमदार तानाजीराव सावंत यांनी विरोधकांसह चुकीचे वागणाऱ्या अधिकारी यांना इशारा दिला. विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर वर्क्स संचालित ढोकी येथील तेरणा कारखाना परिसरात विजयी संकल्प व शेतकरी मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, ही जनता आहे, जनता जनार्धन, खरे सरकार हे आहे. आमच्या तुळजापूर तालुका प्रमुखाने सांगितले की खोट्या केसेस करायच्या आत टाकायचे. सरकारी अधिकारी यांना हाताशी धरायचे. एका पत्रकाराला आत टाकले, हा तानाजी सावंत आहे माझी 2 वर्षाची कारकीर्द पाहिली आहे. अधिकाऱ्यांनो चुकीचे कराल तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा. ही जिल्हा परिषद संपु द्या मी काय आहे ते दाखवतो. जनतेवर अन्याय करत त्रास देत असाल तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मला हे मान्य नाही, हे सहन करणार नाही असे म्हणाले.
सत्ता असल्याची कोणाला डोक्यात घमंड असेल तर सत्ता माझी सुद्धा आहे. आमचाही उपमुख्यमंत्री आहे त्याच्या पुढे आम्ही रक्ताचे बाळासाहेब यांचे कडवे शिवसैनिक आहोत. आम्ही कोणाची डाळ शिजू देणार नाहीत, आमचा नाद करू नका, हार जीत आमच्यासाठी गौण आहे. आमच्या अंगावर येण्याचे धाडस करू नका अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, मग तुम्ही कोणीही असाल असे म्हणत इशारा दिला.
तुळजाभवानी गाभारा बाबत इतकी विटंबना होणे मान्य नाही, याचे कारण काय ? याचा रागही येतो व तुमचे चेहरे बघितले की त्याचं वाईटही वाटत कारण रझाकाराची ही औलाद तुमच्या छातीवर नाचत असताना आपण गप्प कसे ? हा त्यांचा की आपला दोष आहे. असे काय आहे ज्यामुळे त्यांची वेठबिगारी करावी लागते, कोणती गोष्ट आहे त्याचा त्रास होतोय. याच्या सारखे 10 जण जरी आले, कोणतेही संकट आले तरी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून समोर उभे राहणार असे मी वचन देतो. मी बघतो त्याच्यात किती दम आहे ते असे म्हणत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना थेट आव्हान दिले.












