भुम/परंडा – समय सारथी – किरण डाके, नितीन गुंजाळ
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भुम परंडा वाशी मतदार संघांचे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे नगर परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत. भुम येथे संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली तर परंडा येथे जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली बांधणी सुरु आहे. ही कार्यकर्ते यांची निवडणुक असुन त्यांना सावंत बळ देणार आहेत.
भुम, परंडा नगर परिषद व वाशी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी मोर्चेबांधणी केली असुन ते बैठका घेऊन कार्यकर्ते यांना बळ देणार आहेत. 7 नोव्हेंबर शुक्रवार व 8 नोव्हेंबर शनिवार अश्या 2 दिवस ते बैठका घेऊन संवाद साधतील. सध्या तरी एकला चालो रे असा कार्यकर्ते यांचा सुर असुन तशी मोर्चेबांधणी सुरु आहे.
पाहिल्या टप्प्यात ‘मिशन नगर परिषद’ असुन त्यानंतर ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लक्ष देतील. भुम, परंडा, वाशी येथील बैठका नंतर ते जिल्ह्यातील धाराशिव कळंब सह अन्य नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठका घेतील अशी माहिती आहे.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यात त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून, परंडा ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होईल. सायंकाळी 6 वाजता परंडा येथील जाकिरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी परंडा नगर परिषद संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.
शनिवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भूम येथील साहिल फंक्शन हॉलमध्ये भूम नगर परिषद पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडेल. त्यानंतर दुपारी 1 वाजता त्याच ठिकाणी भूम ग्रामीण भागातील पदाधिकारी बैठक होईल. दौऱ्याचा समारोप दुपारी 3 वाजता तांदुळवाडी येथील शिवशक्ती शुगर येथे वाशी तालुका व शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीने होणार आहे.
भुम परंडा वाशी या मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके यांनी केले आहे.












