धाराशिव – समय सारथी
तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्पष्टीकरण देताना अनेक खुलासे करीत विरोधकांवर आरोप करीत कारवाईचा इशारा दिला. विपरीत अर्थ काढुन षडयंत्र रचले जात असुन नामोहरण केले जात आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी दिल्याबद्दल महसूलमंत्री बावनकुळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा नागरी सत्कार केला, ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद पिटू गंगणे यांनी हा सत्कार केल्याने मोठे वादंग उडाले होते, त्यावर आमदार पाटील यांनी खुलासा केला.
खासदार ओमराजे एव्हडे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणे आपणं योग्य नाही असे मी आधीच सांगितलं आहे असे पाटील म्हणाले. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील काही आरोपीना आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे पाठीशी घालत असल्याचा आरोप ओमराजे यांनी केला होता त्यावर पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.
प्रसार माध्यमात ज्या बातम्या आल्या त्या एक बाजु सांगणाऱ्या आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे आता न्यायालयात आहेत, धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टात जे शपथपत्र सादर केले आहे ती माहिती पत्रकार यांना उपलब्ध करून दिली जाईल. ज्या व्यक्तीच्या बाबतीत सांगितलं जातंय ते वास्तव समोर येईल. त्या शपथपत्रात जे असेल ती माहिती पत्रकार दुसरी बाजु म्हणुन योग्य पद्धतीने जनतेच्या समोर मांडावी अशी विनंती त्यांनी केली. जे काही घडलं त्याचा विपरीत अर्थ काढुन काही जन जाणीवपूर्वक षडयंत्र करून तुळजापूर व तुळजापूरच्या लोकांचं नामोहरण करीत आहेत, त्या बाबतीत काही तक्रारी तपशीलवार आल्या आहेत, त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई नक्की होईल.
तुळजापूरमध्ये निवडणुकीच्या काळात मी घरोघरी गेलो तेव्हा एक विषय समोर आला की अगदी लहान मुले देखील अमली पदार्थाच्या नादाला लागली आहेत, माता भगिनी यांनी ही माहिती दिली त्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की निवडणुक प्रक्रिया संपली की हा विषय गांभीर्याने घेऊन पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा नक्की करू. डिसेंबरपासुन याचा पाठपुरावा सुरु केला, कोण सहभागी आहे त्यांची नावे सुरुवातीला मिळणे कठीण जात होते. एकदा नावे कळाली की तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्याकडे ती नावे देण्यात आली, छापे टाकण्यात आले मात्र त्यात यश मिळाले नाही.
काही लोक या प्रक्रियेत जोडली गेली, त्यांना पोलिसांकडे पाठवले, त्यांनी यात सहकार्य करून तुळजापूर येथे जे अमली पदार्थ येत होते ते उघड करण्यात मदत केली, पोलिसांनी हे सगळे रेकॉर्ड घेतले, हे वास्तव आहे.त्यांच्यामुळे हे उघड झाले, काही प्रमाणात चुकीच्या गोष्टींना आळा बसला. वेगवेगळ्या पक्षाचे लोक यात गुंतले होते, काही लोकप्रतिनिधी तिथे काय सुरु आहे हे दुरुस्त करण्याऐवजी दुसऱ्या गोष्टी बोलत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आपणं ज्या पद्धतीने तुळजापूरमध्ये कारवाई करायला लावली तशी कारवाई दुसरीकडे झाली नाही, हे वास्तव जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
तुळजापूर येथील पुजारी, तिथल्या माता भगिनी यांच्या बाबतीत जे खोटं नाट बोलले आहेत ते अतिशय अयोग्य झालेले आहे आणि मनाला क्लेश वाटेल अश्या प्रकारचे झालेले आहे. मला इतकीच विनंती करायची आहे की, हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे तुळजापूर आहे. राजकीय स्वार्था पोटी तुळजापूर व आई भवानी बाबतीत असे काही चुकीचे होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही. बाकी सर्व करणारा वरचा देव आहे पण आपलीही काही जबाबदारी असते. आपणही काही गोष्टी मनात, हृदयात बाळगून कृती करणे अपेक्षित असते. कोणी काही म्हणाले तर ते मानने अयोग्य आहे, वास्तव पाहणे गरजेचे आहे.
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो पण मर्यादा सोडून वागलं गेलं तर योग्य ती कारवाई होईल, अनेकांनी ती भावना व्यक्त केली आहे, माहिती दिली आहे. ही भावना माझ्यासह तुळजापूरकर यांची आहे कारवाई होईल असे आमदार पाटील म्हणाले.