अँटी नार्कोटिक्स क्लब मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार महाविद्यालयात स्थापन करण्याची घोषणा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील काही भागांमध्ये ड्र्ग्सची तस्करी आणि सेवनाचे प्रकार आढळून आले आहेत. सामाजिक आरोग्यासमोर निर्माण झालेला हा गंभीर प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना अँटी नार्कोटिक्स क्लब स्थापन करण्याचे आवाहन विधानसभेत केले आहे. त्या अनुषंगाने असे क्लब स्थापन करण्यासह ड्रग्स तस्करी व सेवनाची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचे म्हणजे ड्रग्सचे सेवन हा एक अतिशय गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात अंमली पदार्थांची तस्करी व सेवनाचे प्रकार समोर आले आहेत. नागरिकाांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे गृह विभागाला कारवाई करण्याच्या कामात मोठे सहकार्य झाले आहे. ड्रग्सची माहिती देणाऱ्यांची नावे यापुढेही गोपनीय ठेवली जातील, ती बाहेर येणार नाहीत. हा विषय व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहकार्याने अँटी नार्कोटिक्स क्लब स्थापन करण्याबाबतचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तरा वेळी मांडला. ड्रग्सची तस्करी, ड्रग्स सेवनाची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. ही बाब जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांना देण्यात आली आहे.
अंमली पदार्थ तस्करी व सेवन हा एक अतिशय गंभीर सामाजिक प्रश्न असून गृह विभागाच्या कारवाईसह समाजातील विविध घटकांनी देखील पुढाकार घेत आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरुवातील जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये अँटी नार्कोटिक्स क्लब सुरु करण्यासाठी संबंधित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन देखील याबाबत सतर्कतेने, तत्परतेने योग्य ती कारवाई करेल, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.