धाराशिव – समय सारथी
धाराशिव, तुळजापूरसह अन्य भागात औदयोगिक वसाहत, विविध उद्योग व रोजगार निर्मितीची ‘संकल्पना’ मांडल्यानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी वाशी तालुक्याकडे विकासाचा ‘मोर्चा’ वळवला आहे. वाशी तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी तेथे फटाका व लॉजिस्टिक पार्क उभारणी करून रोजगार निर्मिती करण्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भेटू देऊन पाहणी केली.
यापुर्वी देखील तेरखेडा वाशी येथे फटाका उद्योग निर्मितीची घोषणा केली होती मात्र त्यावेळी ‘योग’ नव्हते मात्र आता लवकरच उद्योग सुरु होण्याचे संकेत आमदार पाटील यांनी दिले आहेत. माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चातुन अनेक विकास कामे केली आहेत, स्वखर्चातुन विकास व कामे करण्याची सावंत यांची ‘परंपरा’ आमदार पाटील जपत काही विकास कामे वाशी भागात स्वखर्चातुन सुरु करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार पाटील यांच्या पोस्टमध्ये म्हणटले आहे की, वाशी येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, या परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. येथे फायरवर्क्स पार्क व लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी देखील प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच या भागातील आर्थिक विकासालाही नवे बळ मिळणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.