खासदार ओमराजे व स्वामींचे पत्रातील मजकुर सारखाच, त्या 2 पत्रातील सही वेगळी – ‘आमदार’ पदाची प्रतिष्ठा
धाराशिव – समय सारथी
उमरगा – लोहारा मतदार संघांचे आमदार प्रवीण स्वामी हे पुन्हा एकदा नवीन वादात अडकले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे वितरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार स्वामी यांना बोलावण्यात आले नाही, त्यावरून वाद सुरु झाला. राजशिष्टाचार भंग प्रकरणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर 7 दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्या कार्यक्रमाला आपली मूक संमती होती असे मानून जिल्हाधिकारी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी दिला.
स्वामी यांच्या पहिल्या पत्रात लोकसभेत हक्कभंग आणू असा उल्लेख आहे. स्वामी हे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार मग ते लोकसभेत हक्कभंग कसा आणणार ? राजशिष्टाचारनुसार मला व आमदार प्रवीण स्वामी यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता खासगी ठिकाणी मदत वाटप करण्यात आले असे त्या पत्रात नमुद आहे. स्वामी यांची 2 वेगवेगळी पत्र समोर आली असुन त्यात सही वेगळी आहे तर मजकूर सारखाच आहे.

आमदार स्वामी यांनी हे पहिले पत्र उमरगा येथील काही पत्रकार यांना पाठवले मात्र ते पत्र वाचल्यावर काहींनी स्वामींना फोन करून चुक लक्षात आणुन दिली त्यानंतर ते त्यांनी डिलीट केले मात्र तोपर्यंत ते पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते असे तिथल्या पत्रकार यांचे म्हणणे आहे. आमदार स्वामी हे नामधारी, सही पुरते नाममात्र अश्या विविध टिकेला तोवर सुरुवात झाली होती.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याच विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिले आहे त्यातील व आमदार प्रवीण स्वामी यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर सारखाच आहे, हा योगायोग आहे का ? आमदार स्वामी यांच सुरुवातीला जे पत्र व्हायरल झाले त्यावरील व नंतर दिलेल्या दुसऱ्या पत्रावरील स्वामी यांची सही ही वेगवेगळी आहे, त्यातील फरक स्पष्ट दिसतो. आमदार स्वामीचे पत्र परस्पर कोण टाईप केले, त्यावर सही कोण केली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार स्वामी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही, त्याची सोशल मीडियावरही चुप्पी आहे.
आमदार स्वामी समर्थक हे पत्र ‘कांड’ असुन हा खोडसाळपणा असल्याचे सांगत आहेत, विरोधकांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे असे ते म्हणत आहेत. स्वामी जर खरेच यात नसतील तर त्यांनी स्वतःचे निर्दोषत्व व ‘आमदार’ या संविधानिक पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी पुढे येऊन ठोस भुमिका घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी विधीमंडळ समितीकडुन किंवा पोलिसांकडुन करण्याची मागणी व तक्रार स्वामी करणार का ? हे पाहावे लागेल.
विरोधकांनी आकस बुद्धीने कट रचून हे खोटे पत्र बनवले व व्हायरल केले असाही आरोप स्वामी समर्थक यांच्याकडुन होत आहे त्यामुळे विरोधकांनी सुद्धा ‘सत्य’ समोर येण्यासाठी तक्रार देण्याची गरज आहे. दोघापैकी खरा कोण हे जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. हा विषय फक्त स्वामी या एका व्यक्ती पुरता मर्यादित किंवा एका आमदार यांचा नसुन हा विधीमंडळ प्रतिष्ठा व नियमांचा आहे, त्यामुळे याची पोलिसात व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणे गरजेचे आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांना लोकसभा व विधानसभा या दोन्ही सभागृहातील दांडगा अभ्यास असुन त्यांनी या पत्र कांडाची चौकशीची मागणी करणे गरजेचे आहे. एका आमदाराचे पत्र तयार करण्याची, त्यावर सही करण्याची हिम्मत कोणी केली. स्वामी यांच्या आजवरच्या विधिमंडळ कामकाजातील व इतर ‘पत्रव्यवहार’ सुद्धा या निमित्ताने तपासून पाहण्याची गरज आहे. तिथेही असा वेगवेगळ्या सहीचा प्रकार झालेला नसावा.
निवडून आलेला कोणताही व्यक्ती किंवा आमदार हा नामधारी व सही पुरता नसावा, ही लोकशाही व्यवस्थेत अपेक्षा आहे. धाराशिव जिल्ह्यात असा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. किमान सही तरी करू द्या हो असे म्हण्याची वेळ आली आहे.
दरम्यान स्वामी यांच 2024 साली निवडणुक उमेदवारी अर्ज भरतानाचे शपथपत्र व इतर ठिकाणी सही यापेक्षा वेगळी आहे, त्यामुळे अधिक खुलासा तेच स्पष्टपणे करू शकतात. राजकारणात ‘दल’ बदलू सारखे सही ‘बदलू’ असे होऊ नये म्हणजे झाले.