धाराशिव – समय सारथी
विधिमंडळ सभागृहात ड्रग्सची पाळेमुळे खोदून काढू असे म्हणायचे आणि दुसरीकडे ड्रग्सची पाळेमुळे रुजविणाऱ्या लोकांना बळ द्यायचे, हेच का तुमचे पारदर्शी, गतिमान सुशासन ? तुमचे अशा कृत्यांना पाठबळ आहे, असे समजायचे का ? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर, आम्ही ठरवू ते धोरण, हे या सुजान, सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही अशी टीकाही केली.
तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. आई तुळजाभवानीच्या निवासाने आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन अशा या धार्मिक शहरात ड्रग्स कोणी आणले, गुन्हेगारी कोणी वाढीस लावली, तरुणाईला वाममार्गाला कोणी लावले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही हे सरकार अशा प्रवृत्तीना पाठीशी घालण्याचे नव्हे तर त्यांना बळ देण्याचे काम करीत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुळजापुरात ड्रग्स प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्याकडून सत्कार स्वीकारला. इतक्यावर ते थांबले नाहीत तर, त्यास बोलावून घेत पाठीवर थापही दिली. याचा जनतेने अर्थ काय घ्यायचा ? असा सवाल केला.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, तुळजापूरसह ग्रामीण भागात ड्रग्स माफियानी जो उच्छाद मांडला आहे, तो पूर्णतः मोडून काढण्याच्या अनुषंगाने आपण कार्यवाही संदर्भातील तपशील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. ती लक्षवेधी उत्तरासाठी गृह विभागाकडे पाठवली होती. सभागृहात पाटलावर उत्तर येण्यापुर्वी त्याचे उत्तर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी मतदार संघातील तुळजापूर पत्रकार ग्रुपवर लीक करण्यात आले. ड्रग्ज सारख्या संवेदनशील विषयात हे उत्तर कोणी व कोणासाठी लीक केलेला याची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे.
सभागृहात उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की संबंधित विभागाकडून लक्षवेधी परस्पर खाली गेली असेल तर दोषी वरती कारवाई करण्यात येईल. एकीकडे आपण चौकशी करून दोषी वरती कारवाई करू असे म्हणताय तर त्यातीलच आरोपीवर कौतुकाची थाप देत पाठराखण करताय मग यांच्यावरती सरकार एक प्रकारे याला पाठिंबा देऊन प्रोत्साहन देत नाही का असा सवाल केला. मंत्र्यांनी कौतुकाची थाप दिल्यावर कोणता पोलीस कारवाई करणार असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थितीत केला.