तुळजापूर तस्करीतील मुख्य आरोपी मोकाट, अटक करा – आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर व परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणात मी एक लक्षवेधी मांडली होती मात्र लक्षवेधी उत्तर विधीमंडळात येण्यापुर्वीच त्याचे उत्तर लीक झाले. ज्या दिवशी उत्तर सोशल मीडियावर उत्तर लीक झाले त्याच दिवशी परंडा गुन्ह्यात पोलिसांनी कोर्टात समरी पाठवली व गुन्हा रद्द करावा असे सांगितले. परंडा येथे पकडलेले ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचे प्रयोगशाळा अहवालात स्पष्ट झाले मग या संपुर्ण प्रकरणाचा तपास करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत चर्चे दरम्यान केली. तुळजापूर ड्रग्ज तस्करीतील मुख्य आरोपी अजुनही मोकाट आहे त्याला अटक करा अशीही मागणी त्यांनी केली.
आमदार कैलास पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीचे 27 पानी उत्तर असलेली पीडीएफ फाईल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे यांनी पत्रकार ग्रुप तुळजापूर यावर व्हायरल केले होते, त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात हा मुद्दा मांडला होता. हे उत्तर पीएला कोणी, कोणाच्या सांगण्यावरून व का पाठवले याची चौकशी करा अशी मागणी केली होती त्यानंतर तालिका अध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. अंतीम आठवडा प्रस्तावात चर्चेदरम्यान पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी ड्रग्ज तस्करीचा मुद्दा मांडत चिंता व्यक्त केली. सरकार या उत्तर लीक प्रकरणावर काय करते हे पाहावे लागेल.

परंडा येथे कारवाई झाली आणि एका आरोपीला अटक केले त्यानंतर 7 महिने तपास करुन दुसऱ्या आरोपीला अटक केले. ड्रग्ज प्रकरणात मी एक लक्षवेधी मांडली होती मात्र दुर्दैवाने ती चर्चेला आली नाही, परंतु लक्षवेधीचे उत्तर विधीमंडळात येण्यापुर्वी लीक झाले. ज्या दिवशी पोलिस अधीक्षक यांनी उत्तर पाठवले त्याचं दिवशी परंडा येथील कारवाईत पकडलेले ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचे सांगत गुन्हा रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी कोर्टात पाठवला, हा निव्वळ योगायोग की दुसरे काही आहे याचा तपास झाला पाहिजे असे ते म्हणाले. मोठ्या शहरात अंमली पदार्थाची विक्री होते हे आजवर आपण ऐकले होते मात्र धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यात ड्रग्ज विक्री व सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे असे म्हणत आमदार पाटील यांनी चिंता व्यक्त केली.
तुळजापूर येथे 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले, याचे कनेक्शन तुळजापूर, सोलापूर, पुणे, मुंबई अश्या ठिकाणी आहे. 19 जणांना आरोपी केले असुन तुळजापूर येथे पान टपरीवर ज्या प्रमाणे पान मिळते त्या प्रमाणे ड्रग्ज मिळत होते. मुख्य आरोपी अजुन मोकाट असुन एसआयटी नेमावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. मुख्य आरोपी कोणाच्या जवळचा आहे, लांबचा आहे हे पाहता अटक केली पाहिजे, ड्रग्जचे लोन ग्रामीण भागात येत आहे ही गंभीर बाब असुन मागे तत्कालीन गृहमंत्री स्व आर आर पाटील यांनी डान्सबार बाबत कडक धोरण अवलंबिले होते तसे धोरण ड्रग्ज बाबतीत घेतले पाहिजे. राजकीय नेते, पोलिस कोणीही असो त्यांच्या मुसक्या आवळल्या तरच पुढची पिढी वाचू शकते असे ते म्हणाले.