धाराशिव – समय सारथी
जिल्ह्यात 2024 च्या खरीप हंगामात पाऊस काळ चांगला झाला असून जिल्हयात चार लाख 62 हजार 872 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली होती. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले आहे. मात्र खरेदी केंद्राची अपुरी संख्या व बारदाना अभावी 20 पैकी 12 केंद्र बंद पडले आहेत. या सर्व केंद्राना तातडीने बारदाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव असल्याने शेतकरी आपले सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत. धाराशिव जिल्हयामध्ये सद्यस्थितीत 20 खरेदी केंद्र कार्यरत आहेत. परंतु यातील 12 खरेदी केंद्र बारदाना उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत. उर्वरीत चार खरेदी केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना उपलब्ध असून तेही खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीन नाईलाजाने खाजगी बाजारपेठेत घालावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.धाराशिव जिल्हयातील बारदाना अभावी बंद असलेल्या खरेदी केंद्रास बारदाना मुबलक प्रमाणात बारदाना उपलब्ध करुन ते चालु करणे आवश्यक आहे.धाराशिव जिल्हयातील बारदाना अभावी बंद पडलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रास मुबलक प्रमाणात बारदाना उपलब्ध करुन देऊन ते पुर्ववत चालु करण्याची मागणी आमदार पाटील यांनी मंत्री रावल यांच्याकडे केली आहे.