धाराशिव – समय सारथी
कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावर त्या त्या मतदार संघातल्या उमेदवारीबाबत मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे परंतु या निवडणुकीसाठी माझ्या नावाचा उल्लेख केला जात असला तरी याचा अर्थ मी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक आहे असा होत नाही. विशेषतः मी माझ्या राजकीय कारकिर्दीत धाराशिव जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीने जी धोरणे राबविली जातात केवळ याच बाबीकडे लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील राजकीय हस्तक्षेप कटाक्षाने टाळलेला आहे. माझ्या मतदार संघातील केवळ विकास कामांनाच माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे त्यामुळे मी विधानसभा सदस्य म्हणून अत्यंत समाधानी आहे.
माझे राजकीय गुरु माजी खासदार रवींद्र गायकवाड हेच आगामी धाराशिव लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार असावेत म्हणून माझे प्रयत्न राहतील.
प्रा रवींद्र गायकवाड यांना 2009 साली अवघ्या 5-6 हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला होता तर 2014 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झाले होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे.
मी लोकसभा निवडणुक लढवण्यावचा प्रश्नच येत नाही, मागील 15 वर्षाच्या कार्यकाळात त्याच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत आहे. सध्या उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणला असुन अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रीमंडळाचे सहकार्य लाभले आहे.
धाराशिव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उमरगा लोहारा येथील आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उल्लेख आमचे भावी खासदार असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती मात्र पालकमंत्री सावंत यांची चौगुले यांना पसंती असल्याचे बोलले गेले त्यानंतर आमदार चौगुले यांनी लेखी पत्र काढत वरील खुलासा केला आहे.