मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी साधला संवाद – समाजाचं देण लागतो, 2 दिवसात बैठक होणार
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी अंतरवली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, सगेसोयरे अंमलबजावणी व्हावी व मराठा आंदोलक यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी 6 दिवसापासून जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे.जरांगे यांची प्रकृती खालवली असल्याने मंत्री सावंत यांनी त्यांची भेट घेतली व रोखठोक भुमिका स्पष्ट केली. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून नाही तर आपण समाजाचं काही देणं लागतो, मराठा समाजाच्या व जरांगे यांच्या प्रेमापोटी मी अंतरवलीला आलो असे मंत्री सावंत म्हणाले.
मंत्री तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री यांनी त्यांना आश्वासन दिले की येत्या 2 दिवसात सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्वजणांची एक बैठक घेऊ आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. सावंत यांनी भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासाने सरकारचे शिष्टमंडळ मंत्री शंभुराज देसाई, खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वात आले व त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली व ती जरांगे यांनी दिल्याने उपोषण स्थगित केले.
मनोज जरांगे यांना आम्ही ज्या अवस्थेत पाहत आहोत ते आता पाहवत नाही. मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून या व्यासपीठवर आलो आहे. वेळीवेळी सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला सांगितल्या आहेत, मांडल्या आहेत त्यामुळे कळकळीची विनंती आहे की मराठा आरक्षण द्यावे, 2 दिवसापुर्वी ज्यावेळी बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले होते की येत्या 48 तासात जरांगे यांचे आंदोलन सकारात्मक निर्णय घेऊन संपले पाहिजे. जी भुमिका पक्षाच्या बैठकीत घेतली आहे तीच भुमिका आज घेतली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पहिल्यापासुन माझा जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे असे मंत्री सावंत म्हणाले.
12 जुन रोजी धाराशिव येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यात नेतृत्वात मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली येथे भेट घेत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला त्यानंतर मंत्री सावंत हे स्वतः जरांगे यांना भेटून यशस्वी शिष्टाई केली व आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना न्याय देणेच्या दृष्टीने सरकारने मराठा समाजास आरक्षण देणे आवश्यक आहे तसेच मराठा समाज बांधवाला ओबीसीमध्ये कुणबी मराठा सगेसोयरे या शब्दाचा आंतरभाव करुन लाभ मिळणेसाठी आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणास भूम, परांडा, वाशी तालुक्याचे वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.