यापुढे विकासाचे राजकारण – सभेची तयारी पूर्ण, सावंत यांनी केली सभास्थळाची पाहणी
धाराशिव – समय सारथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या धाराशिव शहरात प्रचार सभा होणार असुन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी नितीन काळे, सतीश दंडनाईक, अनिल खोचरे, सुरज साळुंके, बाळासाहेब शिंदे,अजित लाकाळ यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. मोदी हे महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. 25 एकरात ही सभा होणार असुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असुन केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हा डाग पुसला जाऊ शकत नाही. इथे केंद्राच्या मोठ्या पॅकेज व उद्योग धंदे याची गरज आहे. गेली 40 वर्षांपासुन पाण्याचा प्रश्न काँग्रेसने प्रलंबित ठेवत राजकारण केले. हक्काचे 22 टीएमसी पाणी आणून हा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे साकडे घालणार असल्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत म्हणाले.
2019 ला ओमराजे निंबाळकर कसे निवडून आले सगळ्यांना माहित आहे त्यामुळे त्यांनी फॉर्म भरल्यापासून मी त्यांना माजी खासदार असे बिरूद लावले आहे. मी तुम्हाला संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीने ग्वाही शब्द वचन देतो की , आजवर भावनेचे राजकारण झाले मात्र यापुढे विकासाचे राजकारण होणार आहे. विकासाची गंगा वाहणार आहे. इथला तरुण फक्त मोदी आणि विकास पाहत आहे त्यामुळे कुठल्याही भूलथापा गोड गोड बोलणे किंवा नाटक याला थारा देणार नाही. इथला युवक पेटून उठलेला असून धाराशिव चा महायुतीचा उमेदवार दोन लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास मंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
भारताच्या आजवरच्या इतिहासात कुठलाही पंतप्रधान इतके फिरले नाहीत. मोदी हे महाराष्ट्र बरोबरच राज्यभर फिरतात, शरद पवार म्हणले होते कि मोदी घाबरून महाराष्ट्र जास्त सभा घेत आहेत मात्र यांच्या वक्तव्याला मी किंमत देत नाही असे सावंत म्हणाले.