धाराशिव – समय सारथी
राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा तुळजापूर ड्रग्ज तस्करी व मटका किंग असलेला आरोपी विनोद गंगणे यांनी सत्कार केल्यानंतर हीच का संस्कृती असे विचारत सर्वत्र टिकेची झोड उठत आहे. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासासाठी 1 हजार 866 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री बावनकुळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा नागरी सत्काराचे आयोजन गंगणे यांनी केले होते. मंत्री बावनकुळे यांनी केलेल्या कौतुकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
माध्यमांनी या वादग्रस्त प्रकाराबाबत प्रश्न विचारल्यावर महसूल मंत्र्यांनी उत्तर देण्यास स्पष्ट नकार देत “मी सकाळी बोलेन” असे सांगत गडबडीने निघून गेले. त्यानंतर त्यांनी यावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील बोलतील असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांकडून प्रश्नांच्या फैऱ्या वाढल्यानंतर आमदार राणा पाटील यांनी आपण सकाळी बोलूयात, तोपर्यंत तुम्हा सर्वाना पोलिसांचे प्रतिज्ञापत्र पाठवतो ते वाचा, सगळ्यांना सगळे माहित आहे, असे हसत हसत सांगितले. मटका व तुळजापूर ड्रग्स गुन्ह्यातील आरोपीने महसूल मंत्र्यांचा सत्कार आणि मंत्र्यांनी पाठीवर थाप देऊन केलेले कौतुक यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.