धाराशिव – समय सारथी
ज्या जमिनी औद्योगिक विकासाच्या आशेने अनेक वर्षांपूर्वी MIDC साठी देण्यात आल्या होत्या, त्याच वडगाव सिद्धेश्वर (ता. जि. धाराशिव) येथील जागेवर आता धाराशिव आणि तुळजापूर येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ‘कचरा प्रकल्प रद्द करून त्या जागेवर प्रदूषणरहित उद्योग उभारून स्थानिकांना रोजगार द्यावा,’ अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करत गावकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा जो प्रस्ताव आहे, त्याला वडगाव सिद्धेश्वर आणि परिसरातील जनतेने पूर्णपणे विरोध केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, वडगाव सिद्धेश्वर हे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे तीर्थक्षेत्र म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने MIDC साठी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना मोठे उद्योग येण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता याच जमिनींवर कचरा प्रकल्प उभारला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या विकासाच्या स्वप्नांचा घोर अनादर होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम: कचरा प्रकल्पातून निघणारे विषारी वायू, दूषित पाणी आणि दुर्गंधी यामुळे परिसरातील हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येईल. लहान मुले, वृद्ध आणि सर्वांनाच श्वसनाचे, त्वचेचे आणि पोटाचे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. शेतीत घट आणि पर्यावरणाची हानी: कचरा प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित पाणी शेतीत किंवा भूजल स्रोतांमध्ये मिसळून शेती नापीक होईल. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. तसेच, हवा, पाणी आणि जमीन कायमस्वरूपी प्रदूषित होऊन जैवविविधतेलाही धोका निर्माण होईल.
रोजगाराऐवजी बेरोजगारी: ज्या जागेवर शेकडो तरुणांना रोजगार देणारे उद्योग येणे अपेक्षित होते, तिथे कचरा प्रकल्प आल्याने रोजगाराची संधी मिळणार नाही. कचरा प्रकल्पातील रोजगार अत्यल्प आणि आरोग्यासाठी हानिकारक असल्याने तरुणांमध्ये निराशा पसरली आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात: वडगाव सिद्धेश्वर हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. कचरा प्रकल्पाच्या दुर्गंधीमुळे येथील पवित्रता आणि नावलौकिक नष्ट होऊन भाविकांची संख्या घटेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल.
प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह: ग्रामस्थांनी निवेदनातून प्रशासनासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. औद्योगिक विकासाच्या अपेक्षेने दिलेल्या जमिनींवर कचरा प्रकल्प का उभारला जात आहे ? धाराशिव आणि तुळजापूर येथील कचरा प्रक्रिया करण्यासाठी वडगाव सिद्धेश्वर व्यतिरिक्त इतर पर्यायी जागेचा विचार का करण्यात आला नाही, जिथे लोकवस्ती कमी आहे? या प्रकल्पातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाची काय ठोस योजना आहे आणि याची शास्त्रीय माहिती सार्वजनिक का केली जात नाही ? या प्रकल्पामुळे गावाच्या विकासाला खीळ बसणार असल्याने, स्थानिकांना रोजगार आणि विकासाची हमी शासन कशी देणार?
या सर्व मुद्द्यांवर गावकऱ्यांनी अत्यंत तीव्र भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प उभारू देणार नाही, असा निर्धार केला आहे. ग्रामस्थ, शेतकरी, आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या वतीने प्रशासनाकडे या प्रकल्पावर तातडीने स्थगिती आणून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी शासनाने गांभीर्याने दखल घेऊन गावकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वडगाव सिद्धेश्वर MIDC मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे म्हणजे विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक भविष्य पणाला लावण्यासारखे आहे. आमदार महोदय आणि प्रशासनाने या गंभीर परिणामांचा विचार करून, स्थानिकांचे हित लक्षात घेऊन या प्रकल्पाचा निर्णय रद्द करावा आणि खऱ्या अर्थाने रोजगार निर्माण करणारे, पर्यावरणाची काळजी घेणारे आणि स्थानिकांना सन्मानजनक जीवन देणारे प्रकल्प या MIDC मध्ये आणावेत, अशी विनंती केली आहे.
गजेंद्र जाधव, माजी पंचायत समिती सदस्य, धाराशिव –
आमदार यांनी विकासाची संकल्पना मांडताना, ती स्थानिकांच्या हिताची आणि गावकरी,ग्रामस्थांची काळजी घेणारी असावी अशी आमची अपेक्षा आहे. धाराशिव आणि तुळजापूर शहरांचा कचरा वडगावच्या माथी मारून कोणता विकास साधणार आहात? इतरत्र शहराबाहेर, मानवी वस्तीपासून दूर या प्रकल्पासाठी जागा का शोधली जात नाही ? आम्ही वडगाववासीय, आपल्या विकासाच्या विरोधात नाही. आम्हाला विकासाची गंगा आमच्या दारी यावी अशीच इच्छा आहे. पण तो विकास शाश्वत असावा, पर्यावरणाची काळजी घेणारा असावा आणि आमच्या आरोग्याला बाधक नसावा. कचरा प्रक्रिया प्रकल्प हा विकासाचा मार्ग नसून, तो पर्यावरणाचा आणि मानवी जीवनाचा विध्वंस करणारा प्रकल्प आहे.