धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात 2 ठिकाणी विनापरवाना मसाज पार्लर सुरु करण्यात आले होते त्यातील एका मसाज पार्लरचा चालक सोलापूर येथील अनैतिक कांडात अडकला असुन पोलिसांनी त्याला आरोपी केले आहे. हा ‘मासा’ अडकल्याने एक प्रकारे त्याची ‘पोलखोल’ झाली असुन धाराशिवमध्येही हा असाच ‘कांड’ करीत होता याला पुष्टी मिळाली आहे. विनापरवाना मसाज पार्लर चालक,आश्रयदाता यांच्यावर धाराशिवमध्ये कधी कारवाई होणार हे पाहावे लागेल. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी चौकशी व हालचाली सुरु करताच हे सेंटर तात्पुरते ‘शटर डाऊन’ करण्यात आले असले तरी पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.
धाराशिव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या ठिकाणी मसाज पार्लर सुरु करण्यात आले आहेत. इथे आल्यावर 1 ते 2 हजार रुपयांचे बेसिक पॅकेज घ्यायचे व अंधाऱ्या खोलीत आत रूममध्ये गेल्यावर मुलीसोबत ‘अर्थ’ पुर्ण व्यवहार करुन हवे ते ‘हेवन’ सुख मिळेल असा दावा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्स व ज्ञानेश्वर मंदीर परिसरात हे सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी 3-4 मुली मसाज सेवा देण्याचे काम करतात मात्र त्याना कारवाईची ‘कुणकुण’ लागताच तात्पुरते सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. शहरातील ज्या कॉम्प्लेक्समध्ये हे सेंटर सुरु आहे त्या जागेचा मालक हा ‘नगरसेवक’ असुन एका राजकीय पक्षाशी संबंधित असुन त्यांनी नुकतेच पक्षांतर केले आहे, या व्यवसायाला राजकीय पाठबळ तर नव्हे ना असा प्रश्न विचारला जात आहे, संबंधित लोकप्रतिनिधी ड्रग्ज सारखेच यावर पांघरून घालत आहेत. या सेंटरला लागणारी ‘अक्षय’ ऊर्जा राजकारनाच्या माध्यमातून पुरवली जात असल्याचा संशय आहे.
विशेष म्हणजे या मसाज पार्लरचे व्यवस्थापन हे सोलापूर व उत्तर प्रदेशातील काही टोळ्या करीत आहेत. मुंबई, पुणे येथील तरुणीना इथे आणुन त्यांच्याकडुन विविध सेवा दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेश ते धाराशिव हे ‘पार्लर कनेक्शन’ न उलघडलेले कोडं आहे. आगामी काळात मसाज पार्लरचे धाराशिव अशी ओळख होऊ नये, ही अपेक्षा. विनापरवाना सुरु केलेल्या मसाज पार्लरवर व जागा मालकांवर पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे.